देवाडा शाळेत ‘मी अँड माय मॉम डान्स कॉम्पिटिशन’
माय-लेकींची आगळीवेगळी दुनिया

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
देवाडा खुर्द : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवाडा खुर्द येथे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी माता-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मी अँड माय मॉम डान्स कॉम्पिटिशन’ व महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक स्पर्धा.
कार्यक्रमाचे उद्घाटन देवाडा गावचे प्रथम नागरिक श्री. विलासराव मोगरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रमाता विद्यालय देवाडा येथील प्राचार्य मॅकलवार सर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मीनाक्षी जुवारे (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), श्री. दिलीप शिंदे (ग्राम विस्तार अधिकारी), सौ. अल्का बुरांडे व सौ. वेणु बुरांडे (ग्रामपंचायत सदस्य) तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापक डॉ. सौ. अल्का दिपक ठाकरे यांनी माता-पालक मेळाव्याची भूमिका विशद करताना सांगितले की, “शाळा म्हणजे गावाचे छोटे रूप आहे. माता शाळेच्या उपक्रमांत सक्रिय सहभागी झाल्या की शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता समाजाचा केंद्रबिंदू बनते.” महिलांना पुन्हा एकदा आपले बालपण जगता यावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटक श्री. विलासराव मोगरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “डॉ. सौ. अल्का ठाकरे मॅडम यांच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वात देवाडा गावाची जिल्हा परिषद शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थी व पालकांसाठी गुणवत्तापूर्ण कार्य करीत आहे.”
अध्यक्षीय भाषणात मॅकलवार सर यांनी शिक्षणासोबत सहशालेय उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत माता-पालकांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक केले.
या मेळाव्यात महिलांसाठी खेळ, एकपात्री अभिनय स्पर्धा तसेच ‘मी अँड माय मॉम डान्स कॉम्पिटिशन’ घेण्यात आली. या स्पर्धांमुळे मुलांसोबत मातांनीही शाळेच्या प्रांगणात धमाल मस्ती व आनंदाचा अनुभव घेतला.
महिलांच्या सक्रिय सहभागामुळे नृत्य, गायन, नाट्य, हस्तकला, रांगोळी, सजावट अशा विविध कला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान व उत्साह वाढतो. सहकार्य, शिस्त, आदर, संघभावना व जबाबदारी यांसारखी मूल्ये मातांच्या सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये सहज रुजतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. मातांचा सांस्कृतिक सहभाग म्हणजे संस्कृतीची शिदोरी पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य असल्याचेही यावेळी अधोरेखित झाले.
विविध स्पर्धांतील विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शामला तरवटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. निलेश गिरडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अशोक पानसे, सौ. सुधा धामणगे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.



