पोंभुर्णा शहराच्या वैभवात भर
आ. डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘फिश मार्केट’ व ‘भव्य खुले नाट्यगृह’चे लोकार्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते दिनांक २५ जानेवारी रोजी पोंभुर्णा येथे दोन महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे लोकार्पण उत्साहात पार पडले. नगर पंचायत पोंभुर्णा मार्फत उभारण्यात आलेले सुसज्ज फिश मार्केट आणि कलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेले भव्य खुले नाट्यगृह आता नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महाराष्ट्र राज्यगीताने करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा श्रीमती सुलभाताई गुरुदास पिपरे, उपाध्यक्ष श्री अजितभाऊ अरुण मंगळगिरीवार, विरोधी पक्षनेते श्री आशिषभाऊ विलास कावटवार, नगर पंचायतीचे सर्व सभापती, नगरसेवक, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री टांगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगर पंचायतीचे मुख्याधिकारी श्री निखिल लांडगे यांनी आमदार डॉ. मुनगंटीवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेते व नगरसेवकांनी मिळून नगर पंचायत इमारतीची प्रतिकृती, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार केला.
पोंभुर्णा शहराच्या विकासासाठी आमदार मुनगंटीवार यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार व मुख्याधिकारी निखिल लांडगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
फिश मार्केट प्रकल्पाचे कंत्राटदार श्री एम. बी. आसुटकर, श्री एम. एस. आर. मूर्ती, तसेच खुले नाट्यगृह प्रकल्पाचे कंत्राटदार श्री निकुंज पटेल यांचा देखील आमदारांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मार्गदर्शन करताना आमदार डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले, “विकासकामे ही टिकाऊ, दर्जेदार आणि लोकांच्या दैनंदिन उपयोगाची असली पाहिजेत. फिश मार्केटमुळे मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळेल, तर खुले नाट्यगृह पोंभुर्ण्यातील कलावंतांसाठी सांस्कृतिक केंद्र ठरेल. पोंभुर्णा शहराचा विकास हा जिल्ह्यासाठी आदर्श मॉडेल बनेल.”
मुख्याधिकारी निखिल लांडगे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “आमदार मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोंभुर्णा शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. आज लोकार्पण झालेले हे दोन्ही प्रकल्प केवळ बांधकाम नसून, शहराच्या आर्थिक व सांस्कृतिक समृद्धीची केंद्रे आहेत.”
नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे यांनी आपल्या मनोगतात आमदार मुनगंटीवार यांना पोंभुर्णा शहराचे विकासशिल्पकार संबोधत सांगितले की, “दिलेला शब्द पूर्ण करणारे नेतृत्व म्हणजे सुधीरभाऊ. आजचे फिश मार्केट आणि खुले नाट्यगृह हे ‘शब्द आणि कृती’ यांचे जिवंत उदाहरण आहे.”
या कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा शहरासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य रस्त्याच्या कामास तात्काळ मंजुरी
सुमारे ४१ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर, तसेच नगर पंचायतीवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी २ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वीज खर्च कमी करण्यासाठी सोलर प्लांट उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन
कार्यक्रमाला नगर पंचायत पदाधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव, प्रतिष्ठित नागरिक व मासळी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री रोशन येमूलवार, तर आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक श्री शब्बीर अली यांनी केले.
लोकार्पणानंतर नूतन खुल्या नाट्यगृहात भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनानंतरचा हा पहिलाच सांस्कृतिक सोहळा असल्याने नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली. नामवंत कलावंतांच्या गायन-संगीताने रसिक मंत्रमुग्ध झाले.



