प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
जिल्हाधिकाऱ्यांसह विरपत्नी, विरमातांचा सत्कार ; पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सांस्कृतिक कार्यक्रम व उत्कृष्ट संचलन पुरस्कार
वर्धा : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा पोलिस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबाबत जिल्हाधिकारी वान्मथी सी, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांचा तसेच विरपत्नी व विरमातांचा डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात विरमाता शांताबाई वरहारे, विरमाता नलीनी टिपले, विरपत्नी जयश्री चौधरी, वीरपत्नी मंदा कोल्हे यांचा समावेश आहे.
पोलिस महासंचालकांकडून सन्मानित करण्यात आलेल्या राखीव पोलिस निरिक्षक शेख मजीद शेख बशीर, बिनतारी संदेश यंत्रज्ञ शशिकांत गजबे, वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलिस हवालदार आशिष देशमुख यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. समुद्रपूर परिक्षेत्र येथील वाघाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवून दोन वाघाला जेल बंद करण्यात यशस्वी कामगिरी केल्याबद्दल उपवनसंरक्षक हरविर सिंग व पथक, जलतरण खेळात राष्ट्रीय प्राविण्य प्राप्त करणा-या अनघा वानखेडे, कबड्डी खेळात प्राविण्य प्राप्त करणारे श्रृती अतकारी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शुध्द देशी गोवंश पालन करणा-या वर्धा पिपल फॉर ॲनिमल या संस्थेच्या तसेच स्काऊट गाईड व रोव्हर रेंजर हर्ष अटेल, श्रावणी अटेल, आदर्श नाईक, कल्याणी लिखार यांचा प्रमाणपत्र देऊन तसेच ध्वजारोहण कार्यक्रमात उत्कृष्ठ पथसंचलन करणारे पथक व सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या शाळांचा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.



