ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी ब्रह्मपुरीत अवैध रेती तस्कराच्या ट्रॅक्टरने NCC विद्यार्थ्यांना चिरडले

ट्रॅक्टरचा हैदोस थांबता थांबेना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- संपूर्ण देश आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा करत असताना, ब्रह्मपुरी तालुक्यात मात्र अवैध रेती तस्करीच्या हैदोसाने दोन निष्पाप विद्यार्थ्यांचे आयुष्य संकटात टाकले आहे. नेवजाबाई हितकारिणी शाळेत ध्वजारोहणासाठी जाणाऱ्या दोन एनसीसी (NCC) विद्यार्थ्यांना एका सुसाट रेती तस्कराच्या ट्रॅक्टरने भीषण धडक दिली. या अपघातात एक विद्यार्थी मृत्यूशी झुंज देत असून, प्रशासनाच्या मूक संमतीमुळेच हे रक्ताचे सडे पडत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

फिर्यादी सोनू हेमराज भुते यांनी दाखल केलेला तक्रारीनुसार, आज दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी पावणे सहाच्या सुमारास, यश प्रकाश मेश्राम (वय १४) आणि त्याचा मित्र रोनक राजू नागापुरे (वय १४) हे दोघे आपल्या एक्टिवा मोपेडने (क्र. MH-34-CP-6139) शाळेत जाण्यासाठी निघाले होते. बोंडेगाव ते कुर्झा रोडवरील राधाकृष्णनगरी जवळ पोहोचले असता, समोरून एन. एच. कॉलेजकडून येणाऱ्या ट्रॅक्टरने क्र. MH-34-CD-7668 त्यांना जोरदार धडक दिली.

ट्रॅक्टर चालक आरोपी दुर्योधन गजानन तलमले वय ३१, रा. भालेश्वर हा आपला ट्रॅक्टर अत्यंत भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवत होता. धडक इतकी भीषण होती की यश मेश्राम याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. तो सध्या ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयातील आयसीयू (ICU) मध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. तर रोनक नागापुरे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर माणुसकी दाखवून जखमींना मदत करण्याऐवजी चालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाल्याचे लोक चर्चेद्वारे कळते. फिर्यादी सोनू भुते यांच्या तक्रारीवरून आरोपी दुर्योधन तलमले त्याचे विरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात कलम २८१, १२५(A), १२५(B) BNS सह १८४, १३४ MV Act अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोहवा तेजराम जनबंधू हे करीत आहेत.

*प्रशासनाची मूक संमती की लाचखोरी?*

ब्रह्मपुरी परिसरात अवैध रेती तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशीही पहाटेपासून हे मृत्यूचे दूत रस्त्यावर धावत आहेत. “शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या रक्ताने रस्ते माखत असताना महसूल आणि पोलीस प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. रेती तस्करांना कोणाचे अभय आहे? प्रशासनाच्या या ‘मूक संमती’ मुळेच आज एका कोवळ्या विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आला असल्याची भावना जनमानसात उमटत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये