सन २०२५-२६ शालेय क्रीडासत्र
सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित शालेय क्रीडासत्र २०२५-२६ अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ २० जानेवारी रोजी प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा. आयुक्त श्री. अकुनुरी नरेश यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “शालेय जीवनात केवळ अभ्यासच नव्हे, तर खेळ व सांस्कृतिक उपक्रमही तितकेच महत्त्वाचे आहेत. खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण तसेच अपयश पचवण्याची क्षमता विकसित होते. आजचा विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक घडवायचा असेल, तर त्याचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे.”
त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले तसेच जे विद्यार्थी यंदा यशापासून वंचित राहिले, त्यांनी खचून न जाता अधिक मेहनत, सातत्य व सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन केले.
यावेळी मनपाच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैयक्तिक व सामूहिक नृत्य स्पर्धा विशेष आकर्षण ठरल्या. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त व सृजनशील सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. स्पर्धांचे परीक्षण सागर अंदनकर व नम्रता बडकेलवार यांनी केले.सर्व खेळांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मोमेंटो, पदके, प्रमाणपत्रे व भेटवस्तू प्रदान करून गौरविण्यात आले.
तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुनिल आत्राम, प्रशासन अधिकारी (शिक्षण) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. राजकुमार केसकर, प्रमुख कार्यवाह यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मुख्याध्यापक, सहायक शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
क्रीडासत्रातील बक्षीस वितरण –
सर्वसाधारण क्रीडानैपुण्य – पि.एम. श्री. शहीद भगत सिंग प्राथमिक शाळा
प्राथमिक विभाग (कन्या) क्रीडानैपुण्य – कर्मवीर कन्नमवार प्राथमिक शाळा
प्राथमिक विभाग (कुमार) व माध्यमिक विभाग (कुमार व कन्या) क्रीडानैपुण्य – पि.एम. श्री. शहीद भगत सिंग शाळा
सांस्कृतिक विभागातील नैपुण्य – लोकमान्य टिळक कन्या प्राथमिक शाळा व पि.एम. श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा या शाळांनी विविध विभागात पुरस्कार पटकावले.



