ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयात शेतीसाठी उपयुक्त AI ॲप मार्गदर्शन सत्र संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे विद्यार्थ्यांसाठी शेतीसाठी उपयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञान व ॲप्स याविषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात कृषी शिक्षणाचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेती क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व, आधुनिक शेतीतील त्याचा उपयोग आणि भविष्यातील संधी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विनायक मेहेत्रे, सहाय्यक कृषी अधिकारी, यांनी AI आधारित विविध शेती उपयोगी ॲप्सची माहिती दिली. त्यांनी महा विस्तार–AI (MahaVISTAAR-AI) या महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या ॲपची विशेष माहिती दिली. हे ॲप मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध असून हवामान अंदाज, बाजारभाव, कीड व रोग नियंत्रण, शासकीय योजना तसेच तज्ञांचा सल्ला एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे उपयुक्त डिजिटल साधन असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकारच्या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक

तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण होऊन शेती क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, असे मत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देवानंद नागरे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो अधिकारी प्रा. योगेश चगदळे यांनी केले. कार्यक्रमास प्रा. विकास म्हस्के, प्रा. अरुण शेळके, विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व पवार व रासेयो विद्यार्थी स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये