ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवडणुकीसाठी मतदान यंत्र सज्ज

आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडली मशीन तयार करण्याची प्रक्रिया

चांदा ब्लास्ट

 चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी १५ जानेवारी रोजी सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिका मतदारसंघात मशीन तयार करण्याची प्रक्रिया (Commissioning of EVM) मनपा झोन क्रमांक ३ कार्यालयात १० जानेवारी रोजी घेण्यात आली.

   सदर प्रक्रियेसाठी उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम यंत्रांची तपासणी, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटची जुळणी, सीलिंग तसेच तांत्रिक चाचणी करण्यात आली. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश मतदान यंत्रे पूर्णतः कार्यक्षम, सुरक्षित व त्रुटीविरहित असल्याची खात्री करणे, तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत पारदर्शकता व विश्वास निर्माण करणे हा आहे. संपूर्ण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात आली.

   चंद्रपूर महानगरपालिका मतदारसंघात एकूण ३५५ मतदान केंद्र आहेत. यासाठी १५५० बॅलेट युनिट, ७२० कंट्रोल युनीट उपलब्ध आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता निवडणूक विभागामार्फत विविध कार्ये केली जात आहेत. यात निवडणूक कर्तव्यावर नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याकरिता सुविधा केंद्र ९,१०,११ व १२ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्येक निवडून निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

  महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदान स्लिप ब्लॉक लेव्हल अधिका-यांमार्फत पोहोचेल याची खातरजमा करण्यात येत आहे. मतदारसंघ क्षेत्रात सकाळ व संध्याकाळ मिळुन १६ स्थीर निगराणी स्थळे ठेवण्यात आली असून त्यांचे मार्फत २४ बाय ७ वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर मतदान यंत्रे पोहचविणे व परत आणणाऱ्या प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा लावण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरून मतदान यंत्र परत महानगरपालिका मतदार संघाकरीता असलेल्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येईल.

 अशी असते प्रक्रिया : ईव्हीएम यंत्र तयार करण्याची प्रक्रिया ही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. यात मतपत्रिका बॅलेट युनीटला लावून सील करणे, प्रत्येक उमेदवाराला मतदान करून बघणे (मॉक पोल), मतदान झाल्यानंतर डाटा जुळवून बघणे. त्यानंतर कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट सील करून स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येते. प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान पथकाला मशीनचे वाटप केले जाते.

यावेळी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अकुनुरी नरेश, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त संदीप चिद्रवार निवडणूक कर्मचारी तसेच निवडणुकीत उभे असलेले उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये