ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारुविक्रेत्यांवर जिल्हा पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम 

गुन्ह्यांत रुपये ०२ कोटी २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. ०९/०१/२०२६ रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध ‘वॉशआऊट” मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये एकूण १२६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०२ कोटी २९ लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावरः मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्ट्यांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण ३७० पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.

पहाटे चार वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.

या कारवाईत एकूण १३२ आरोपींवर १२६ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, या मोहिमेत नवीन कायद्यानुसार ‘ई’ साक्ष अॅप्लिकेशन (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले.

भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत

या अचानक केलेल्या ‘वॉशआऊट “मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, “वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे.”

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये