समर्थ कृषी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन सत्र संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) एककाच्या वतीने करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पदवी शिक्षण घेत असतानाच कौशल्य विकास व प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
बदलत्या काळात केवळ पदवीपुरती मर्यादा न ठेवता बहुआयामी कौशल्ये विकसित केल्यास करिअरमध्ये यश निश्चित मिळते, असे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुहास लांडे यांनी विद्यार्थ्यांना शेती तंत्रज्ञानातील आधुनिक संधी तसेच पदवीनंतर विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा व करिअरच्या विविध पर्यायांबाबत सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता व बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन योग्य करिअरची निवड करावी, तसेच यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्ये व ज्ञान आत्मसात करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. योगेश चगदळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अरुण शेळके यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता, एकात्मता व देशभक्ती या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास प्रा. किशोर कवर, प्रा. सचिन सोळंकी तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



