चंद्रपूर-पुणे/मुंबई दैनिक रेल्वेअभावी होणारी गैरसोय थांबवा
खा. धानोरकर यांची लोकसभेत शून्य प्रहरात मागणी

चांदा ब्लास्ट
औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर येथून राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या शहरांसाठी थेट दैनिक रेल्वे कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्याचा गंभीर मुद्दा येथील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज लोकसभेच्या शून्य प्रहरात प्रभावीपणे मांडला. त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची आग्रही मागणी केली आहे. ‘ब्लॅक गोल्ड सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणी, मोठे वीज प्रकल्प आणि पेपर मिल्समुळे राज्याच्या महसुलात मोठे योगदान देतो. मात्र, औद्योगिकदृष्ट्या इतके महत्त्वाचे असूनही, आजही या भागातून पुणे आणि मुंबई येथे जाण्यासाठी पुरेशा आणि दैनंदिन थेट रेल्वे गाड्या उपलब्ध नाहीत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले की, सध्या चंद्रपूरवरून मुंबई आणि पुण्यासाठी एकही ‘दैनिक’ थेट गाडी नाही. यामुळे हजारो विद्यार्थी, व्यापारी आणि उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अपुऱ्या रेल्वे व्यवस्थेमुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.
या समस्येवर तोडगा काढताना, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर येथे मंजूर झालेले ‘कोचिंग टर्मिनल’ पूर्ण होईपर्यंत नागरिकांना ताटकळत ठेवणे योग्य नाही. त्यामुळे, तात्काळ व्यवस्था म्हणून चंद्रपूर-पुणे आणि चंद्रपूर-मुंबई या दोन्ही मार्गांवर नवीन दैनंदिन ट्रेन्स सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती त्यांनी केली.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी सांगितले की, या तात्पुरत्या उपायांमुळे चंद्रपूर येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. त्यांनी रेल्वे मंत्रालयाने या जनहिताच्या मागणीची त्वरित दखल घ्यावी आणि तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे, जेणेकरून लाखो नागरिकांची गैरसोय दूर होईल.



