कारगिल रणवैद्य कर्नल डॉ. राजेश डब्ल्यू. अधाऊ यांची भद्रावतीला सदिच्छा भेट
९७ अधिकारी व जवानांचे प्राण वाचविणाऱ्या वीर वैद्याचा भव्य सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कारगिल युद्धात रणांगणावर माणुसकी जपणारे, ९७ अधिकारी व जवानांचे प्राण वाचवणारे सेना पदक विजेते कर्नल डॉ. राजेश डब्ल्यू. अधाऊ यांनी अलीकडे ताडोबा पर्यटन स्थळास आपल्या परिवारासह भेट दिल्यानंतर भद्रावती शहरात सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीचे औचित्य साधून भद्रावतीतील मान्यवरांनी त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा भव्य सत्कार केला. १९९९ च्या कारगिल युद्धात कर्नल डॉ. अधाऊ हे १३ जेकें रायफल्सचे रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर (RMO) म्हणून कार्यरत होते. प्रचंड उंची, शून्याच्या खाली तापमान, ऑक्सिजनचा अभाव आणि शत्रूचा सतत गोळीबार अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी युद्धाच्या पुढील रेषेपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर राहून जखमी जवानांवर तात्काळ वैद्यकीय उपचार केले.
‘सुवर्ण तासात’ दिले जीवनदान युद्धातील जखमी सैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ‘सुवर्ण तासात’ कर्नल अधाऊ व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक शिवराज चौहान यांनी अहोरात्र कार्य करत सुमारे ९७ जखमी अधिकारी व जवानांचे प्राण वाचवले. रक्तस्राव रोखणे, श्वसन स्थिर करणे, तातडीचे प्रथमोपचार व मनोबल वाढवणे, अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. भद्रावतीत सन्मान व गौरव भद्रावती येथे त्यांच्या या अतुलनीय सेवेमुळे डॉ. प्रेमचंद, डॉ. माला प्रेमचंद, सामाजिक कार्यकर्ते राजू गुंडावार, ॲड. मिलिंद रायपूरे, डॉ. राकेश तिवारी, संजय गुंडावार आदी मान्यवरांच्या हस्ते कर्नल डॉ. अधाऊ यांचा शाल, पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी कारगिल युद्धातील त्यांच्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. कॅप्टन विक्रम बत्रा यांचे साक्षीदार ७ जुलै १९९९ रोजी पॉइंट ४८७५ (मशकोह) येथे झालेल्या लढाईत परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शेवटच्या क्षणांचे साक्षीदार कर्नल अधाऊ होते. हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व “देशसेवेत योगदान देण्याची संधी मिळणे हेच माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे,” असे भावुक उद्गार त्यांनी यावेळी काढले. त्यांच्या भेटीमुळे भद्रावतीकरांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून तरुण पिढीसाठी ते प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.
कारगिल युद्धातील रणवैद्य म्हणून कर्नल डॉ. राजेश डब्ल्यू. अधाऊ यांचे कार्य केवळ वैद्यकीय सेवा न राहता, ते शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचे जिवंत प्रतीक असल्याची भावना भद्रावतीकरांनी व्यक्त केली



