घमाबाई आश्रम शाळेत ५३ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी उत्साहात
विद्यार्थ्यांनी सादर केले नवनवीन वैज्ञानिक प्रयोग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पंचायत समिती भद्रावती अंतर्गत घमाबाई प्राथमिक/माध्यमिक निवासी आश्रम शाळा, बरांज तांडा येथे आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन ९ डिसेंबरला करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत लेझीम पथकाच्या नृत्यसादरीकरणाने करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष श्री तुकाराम पवार तर उद्घाटक तहसीलदार श्री बालाजी कदम होते. विशेष उपस्थिती अशितोष सपकाळ, पुनम गेडाम,. सुनीता पवार आदी मान्यवरांची होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, सावित्रीबाई फुले, हेलन केलर, लुईस ब्रेल यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. त्यानंतर फीत कापून विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित नवनवीन वैज्ञानिक प्रयोग मांडले होते.
पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया, अक्षय ऊर्जा, रोबोटिक्सचे मॉडेल, पर्यावरण संवर्धन, कृषी आधारित तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक सर्किट्स, ज्वालामुखीचा उद्रेक, स्मार्ट व्हिलेज, मानवी शरीररचना मॉडेल, आपत्ती व्यवस्थापन, हवामान बदल यांसह सुमारे डझनभर प्रयोगांनी प्रदर्शनाला आकर्षक रूप दिले. बालवैज्ञानिकांनी उत्साहात मॉडेल्सची माहिती देत प्रात्यक्षिके करून पाहुण्यांचे व परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त हेलन केलर व लुईस ब्रेल यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती देण्यात आली. मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले आणि विज्ञान क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. राठोड यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पंडित पवार यांनी केले. शिक्षकवर्ग, परीक्षक, केंद्रप्रमुख, कर्मचारी, तसेच लेझीम व बँड पथकाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. थाटामाटात पार पडलेल्या या ५३ व्या विज्ञान प्रदर्शनीने विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूपणाचा आणि वैज्ञानिक चिंतनाचा उत्कृष्ट आविष्कार घडवला.



