ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेत माफियांचा धुमाकूळ; प्रशासन निवडणुकीच्या आडून मौन

वढा परिसरात 24 तास ‘रेतीचे साम्राज्य’, नागरिक त्रस्त

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : वढा परिसरातील अवैध रेत उत्खनन आता पूर्णपणे बेफाम झाले असून माफियांचा दबदबा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून दिवस-रात्र 24 तास रेत उपसा सुरू असून ट्रॅक्टर-ट्रक खुलेआम धावताना दिसत आहेत. संपूर्ण व्यवहार उघडपणे सुरू असताना प्रशासन मात्र ‘निवडणुकीची व्यस्तता’ हा ठरलेला बहाणा सांगत शांत बसल्याचे चित्र आहे. याच निष्काळजीपणाचा फायदा घेत रेत माफिया मनमानी दर आकारून सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारत आहेत.

घरबांधणीसारख्या मुलभूत गरजांसाठीही नागरिकांना महागात रेत विकत घ्यावी लागत आहे, परंतु संबंधित अधिकारी आणि विभागांची कायमची शांतता अद्यापही तशीच कायम आहे. परिसरात अशीही चर्चा सुरू आहे की काही ‘आजी-माजी नेते’ या अवैध धंद्याला पाठींबा देत असल्याने कारवाईची कागदपत्रे नेहमीप्रमाणे धूळ खात पडून आहेत. जेव्हा संपूर्ण गाव आणि परिसर हा उघड गोरखधंदा पाहतो आहे, तेव्हा अधिकाऱ्यांना हे दिसत का नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, चंद्रपूर LCB ची घुग्घुस परिसरातील वाढती ये-जा पाहून नागरिकांमध्ये मात्र कारवाईची आशा निर्माण झाली आहे. पण ही कारवाई कधी होणार, होणारही की नाही—याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. गाव-नुक्कडवर चर्चा तापली असून प्रशासनाचे मौन हे रेत माफियांचे ‘ढाल’ तर बनत नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.

जर संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप केला नाही, तर हा अवैध रेत माफिया आणखी बळावून परिसराच्या नैसर्गिक संपत्तीची हानी करत राहील—आणि त्याची किंमत सामान्य नागरिकांनाच भरावी लागणार हे निश्चित.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये