10 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर धडकणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बालवयामध्ये जीवनाचा परिपाठ देणाऱ्या अंगणवाडी ताईच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तसेच आपल्या न्याय हक्कासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर येत्या बुधवारी 10 डिसेंबर रोजी मोर्चा धडकणार असून मोर्चामध्ये जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका तसेच कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
प्रशासनातील मूळ पाया म्हणजे अंगणवाडी या केंद्रापासूनच शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात,तसेच अंमलबजावणी करण्यात येते,आजही अल्प मानधनात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका तसेच कर्मचारी यांच्या मागण्या या शासनाने मंजूर करून सुद्धा प्रलंबित असल्याने त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे.
यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या वतीने 25 जानेवारी 2024 रोजी अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मानधन तसेच मदतनीस यांना आठ हजार 500 रुपये जाहीर केले होते यामध्ये प्रोत्साहन भत्ता चा उल्लेख नव्हता परंतु शासनाने त्याला हरताळ फासून सेविकाला दोन हजार रुपये तर मदतनीस यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे, दिलेल्या आश्वासनाऐवजी फक्त एक वेळ प्रोत्साहन भत्ता देऊन त्याला सोपस्कारपणे बगल दिलेली आहे. तर दुसऱ्या मागणीमध्ये शासनाच्या योजना ह्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम सदर कर्मचारी हे करत असून त्यांना अद्याप पर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात आलेला नाही.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देणे, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्रमाणे पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ॲक्टनुसार अंगणवाडी कर्मचारी हे ग्रॅज्युएटी साठी पात्र आहे असा निकाल दिलेला आहे तरी याबाबत शासन आदेश निर्गमित करण्यात यावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्यात यावे तसेच प्रमुख मागणी अंगणवाडी सेविकांमधून पर्यवेक्षकाचे पद भरण्यासाठी 50 टक्के आरक्षित जागा कराव्या आणि रिक्त जागा भरण्यात यावे तसेच पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचे काम देण्यात येऊ नये सदर योजना ही आरोग्य विभागाची असून त्यांनी महिला व बाल विकास विभागाच्या माथी सदर योजना मारलेली आहे.
अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन कामे करण्यासाठी तालुकास्तरीय अधिकारी दबाव तंत्राचा वापर करतात त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मानसिक त्रास सुद्धा होतो त्यातून आत्महत्याचे प्रकार सुद्धा राज्यांमध्ये काही जिल्ह्यात घडलेले आहे. ची दखल शासनाने घ्यावी आणि एफ आर एस चेहरा ओळख प्रणाली शासनाने तात्काळ रद्द करावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले मोबाईल हे अत्यंत एकृष्ठ दर्जाचे असून त्यामध्ये पोषण ट्रॅकर एप्स कामेही सुस्थितीत होत नाही टी एच आर वितरणासाठी चेहरा ओळख प्रणालीची आवश्यकता ही रद्द करण्यात यावी या आणि इतर मागण्या मान्य कराव्यात या साठी दिनांक दहाला बुधवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि कर्मचारी यांचा मोर्चा धडकणार असून मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचे कर्मचारी संघटना आयटकच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.
या मोर्चासाठी जिल्ह्यातून तसेच तालुक्यातून जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर गायकवाड, जिल्हा सचिव सुरेखा तळेकर, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष सुनिता तिडके, तसेच तालुका सचिव रेणुका डोईफोडे यांनी केले आहे.



