गोंडपिपरी आणि कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी २८.१० कोटींचा निधी मंजूर
आ. भोंगळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; 'विशेष बाब' म्हणून मिळाला दिलासा

चांदा ब्लास्ट
राजुरा विधानसभा मतदारसंघातील गोंडपिपरी आणि कोरपना तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, निकषापेक्षा कमी पाऊस होऊनही, राज्य शासनाने ‘विशेष बाब’ म्हणून या दोन तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी २८ कोटी १० लक्ष रुपयांचा विक्रमी निधी मंजूर केला आहे.
पावसाच्या निकषांमुळे प्रशासनाने वगळले होते :
ऑगस्ट – सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे गोंडपिपरी आणि कोरपना तालुक्यात शेतपिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. कापूस, सोयाबीन, भात, तूर आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही, शासनाने निर्धारित केलेल्या ६५ मि.मी. (MM) पावसाच्या निकषापेक्षा कमी पाऊस झाल्याचे कारण देत प्रशासनाने सुरुवातीला दोन्ही तालुक्यांना नुकसान भरपाईच्या यादीतून वगळले होते.
आमदार भोंगळे यांचा प्रभावी पाठपुरावा :
या अन्यायाविरुद्ध आमदार देवराव भोंगळे यांनी त्वरित कार्यवाही सुरू केली. त्यांनी लागलीच राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव श्री. राजेश कुमार यांना आणि १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना सविस्तर पत्रव्यवहार केला. त्यांनी पत्रात नमूद केले की, गोंडपिपरी तालुक्यात ६४.०८ मि.मी. आणि कोरपना तालुक्यात ६३.१० मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. हा फरक जरी कमी असला तरी, गोंडपिपरीमध्ये १९६७६.६५ हेक्टर आर. तर कोरपना तालुक्यात १३४०१.१२ हेक्टर आर. क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
आमदार भोंगळे यांनी मानवी दृष्टिकोन ठेवून आणि प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीचा विचार करून, या दोन्ही तालुक्यांचा ‘विशेष बाब’ म्हणून नुकसान भरपाई यादीत तत्काळ समावेश करण्याची जोरदार मागणी केली.
शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय :
आमदार भोंगळे यांच्या मागणीची दखल घेत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना रीतसर प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाच्या आधारावर, शासनाने दि. ०७ डिसेंबर २०२५ रोजी महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला. या निर्णयानुसार, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात ऑक्टोबर २०२५ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी व कोरपना तालुक्यातील ३१४८७ बाधित शेतकऱ्यांच्या ३३०७७.७७ हेक्टर बाधीत क्षेत्राकरिता २८ कोटी १० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
आमदार देवराव भोंगळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हजारो नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना वेळेवर मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबद्दल कोरपना व गोंडपिपरी तालुक्यातील त्यांचे आभार मानले आहेत.



