संविधानाचे पालन हीच खरी राष्ट्रसेवा – आ. किशोर जोरगेवार
महापरिर्निवाण दिनानिमित्त डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना आदरांजली

चांदा ब्लास्ट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याल्याही मार्ल्यापण करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, बहुजन महिला आघाडी प्रमूख विमल कातकर, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, महामंत्री सविता दंढारे, श्याम कनकम, माजी नगर सेविका पूष्पा उराडे, सुषमा नागोसे, खुशबु चौधरी, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, आशु फुलझेले, नितेश गवळी, शितल गुरनुले आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा नाही, तर जागृतीचा दिवस आहे. बाबासाहेबांनी समाजाचे रुपांतर केले. त्यांनी अंधारातून प्रकाशाकडे, गुलामगिरीतून स्वाभिमानाकडे आणि अन्यायातून न्यायाकडे नेणारा मार्ग दिला. आज आपण त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी आदरांजली आहे. बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे आपल्या देशाचे बळ आहे. समानता, स्वातंर्त्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर उभा असलेला हा देश मजबूत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर आहे. संविधानाचे पालन करणे, कर्तव्य बजावणे आणि समाजात सकारात्मकता निर्माण करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. धम्म म्हणजे शांतता, नैतिकता आणि मानवी मूल्ये आहे. एकमेकांचा आदर, सहिष्णुता आणि सद्भावना हीच खरी जीवनशैली आहे.
शिक्षण हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहे. तरुणांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम करावे, समाजासाठी पुढे यावे आणि बाबासाहेबांच्या विचारांची मशाल उजळवत ठेवावी. बाबासाहेबांचा विचार कृतीत उतरवणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. समाजात न्याय, शिक्षण आणि समतेचा दीप पेटत राहिला पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले. यावेळी म्हणाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



