ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सत्य साई बाबांचे संदेश सेवेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ – आ. किशोर जोरगेवार

श्री सत्यसाई बाबा जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

आजच्या वेगवान बदलत्या काळात समाजात प्रचंड स्पर्धा, अस्थिरता, असुरक्षितता आणि वैयक्तिक स्वार्थाचे वादळ दिसते. पण अशा परिस्थितीतही स्वामी सत्यसाईंचे विचार प्रेम, करुणा, शांतता, सत्य, अहिंसा हे मूल्य आपल्याला योग्य दिशा देतात. त्यांनी सांगितलेला मदत करणारे हात हे प्रार्थना करणार्‍या ओठांपेक्षा श्रेष्ठ हा संदेश म्हणजे केवळ विचार नाही, तर सेवेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

सत्य साई बाबा जन्मशताब्दी निमित्त श्री सत्य साई सेवा समितीच्या वतीने श्री सत्य साई देवस्थान येथे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुनगंटीवार, बबनराव तितरमारे, संजय तंगीडवार, दत्तात्रेय कडुकर, सुधाकर देवके, जया मुनगंटीवार, शिल्पा तंगीडवार, सरोज भोयर, प्रज्ञा रघाटाते, अर्चना देवके, ओमेश्वर भोयर, अनुभा बेले, आनंदा अल्याडवार, अश्विनी गोहोकार, सुवर्णा गोहे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा असा दिव्य संदेश देणाऱ्या भगवान श्री सत्यसाई बाबांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित या पवित्र सेवासोहळ्यात सहभागी होताना आनंद आहे. श्री सत्यसाई सेवा समिती गेली अनेक दशके आरोग्य सेवा, शिक्षण, रक्तदान, अन्नदान आणि ग्रामविकास क्षेत्रात निस्वार्थ सेवा करत आहे. आजचा हा पावन सोहळा जन्मशताब्दी वर्षात साजरा होत आहे. सभोवतालचे वातावरण भक्तिभाव, सेवाभाव आणि प्रेमाने परिपूर्ण झाले आहे. आज इथे उपस्थित सेवाभावी बंधू–भगिनींशी संवाद साधण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी प्राप्ती आहे. ही प्रेरणा माझ्या सार्वजनिक जीवनातील सेवाकार्यास अधिक गती देईल, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी श्री सत्य साई बाबांच्या भक्तांची आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये