गडचांदूर नगरपरिषद निवडणूक २०२५ : काँग्रेस – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
वंचित बहुजन आघाडी – जनविकास गोंडवाना प्रणित “नगर विकास आघाडी” संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशन

चांदा ब्लास्ट
गडचांदूर : जलदगतीने विकसित होत असलेले औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून गडचांदूर शहराची ओळख निर्माण झाली असताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि जनविकास गोंडवाना पार्टी प्रणीत गोंडवाना यांनी एकत्र येत “नगर विकास आघाडी” जाहीर केली असून संयुक्त जाहीरनामा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते रविवारी प्रसिद्ध केला आहे. “जनतेचा विकास – सर्वांचा सहभाग” या मुख्य ध्येयविचारावर आधारित या आघाडीने नागरिककेंद्रित, पारदर्शक, सर्वसमावेशक आणि प्रगतिशील प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
गडचांदूरच्या वाढत्या भौगोलिक विस्तार, नागरिकांच्या नव्या गरजा आणि तरुण पिढीच्या आधुनिक स्वप्नांना न्याय देण्यासाठी स्थिर, उत्तरदायी आणि नियोजनबद्ध नेतृत्वाची गरज असल्याचे आघाडीने स्पष्ट केले आहे. सर्वच प्रभागांचा समान विकास, पर्यावरणपूरक आणि स्वच्छ शहर, शिक्षण–रोजगार–आरोग्य–महिला सक्षमीकरण यांवर आघाडीने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
संयुक्त जाहीरनाम्यानुसार ई-गव्हर्नन्स, ओपन डेटा सिस्टीम, पारदर्शक निविदा प्रक्रिया, नागरिकांसाठी ऑनलाइन तक्रार–कर–परवाना प्रणाली सुरू करून कारभार पूर्णपणे लोकाभिमुख करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. “माझं नगर – माझा हक्क मोहीम” राबवून प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेण्याचा निर्णयही जाहीरनाम्यात आहे.
जलजीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करून 24×7 शुद्ध पाणीपुरवठा, सर्व गटरलाइन दुरुस्ती, अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रकल्पाचा विस्तार, प्लास्टिक व्यवस्थापन, कचरा संकलन व बायोमायनिंगद्वारे स्वच्छ शहर घडवण्यावर आघाडीचा भर आहे. “स्वच्छ गडचांदूर – आरोग्यदायी गडचांदूर” ही मोहीम प्रभागनिहाय राबवून स्वच्छता योद्धा समिती स्थापण्याचेही वचन आघाडीने दिले आहे.
शहराला पर्यावरणपूरक व हरित नगर बनवण्यासाठी दरवर्षी १०,००० झाडांची लागवड, चौकांचे सौंदर्यीकरण, शिल्प व गार्डन डेव्हलपमेंट, तसेच स्ट्रीट लाईट्स आणि नगरपरिषद इमारती सौरऊर्जेवर चालविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गडचांदूरला प्रदूषणमुक्त आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्धारही आघाडीने व्यक्त केला.
शिक्षण, क्रीडा, युवक आणि महिला सक्षमीकरणावर मोठी घोषणाबाजी करत मोफत करिअर गाईडन्स सेंटर, डिजिटल लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पोलीस व लष्कर भरती प्रशिक्षण, नगराध्यक्ष चषक, वाचनालये, सेल्फ-डिफेन्स ट्रेनिंग, महिला सुरक्षा हेल्पलाईन, प्रत्येक प्रभागात आरोग्य उपकेंद्र व औषध वितरण केंद्र उभारण्याचे नियोजन जाहीरनाम्यात नमूद आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय शिबिरे आणि सार्वजनिक ठिकाणी ओपन जिम, योगा व फिटनेस झोनचे उपक्रम राबवण्याचेही आश्वासन देण्यात आले.
मजबूत रस्ते, सिमेंट काँक्रिट नाले, ड्रेनेज लाइन, फ्री ड्रिंकिंग वॉटर स्टेशन, आधुनिक सार्वजनिक शौचालये, बसस्थानक उभारणी, शहरातील आठवडी बाजाराचे आधुनिकीकरण, गोंडवाना वस्ती विकास, संस्कृती–क्रीडा–कला संवर्धन, “शहर महोत्सव” आणि समतोल व सर्वसमावेशक शहर निर्मिती या ४० मुद्द्यांचा समावेश जाहीरनाम्यात आहे.
विशेष म्हणजे, शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या शौचालयाच्या पाण्याचे तांत्रिक व वैज्ञानिक व्यवस्थापन करून योग्य विल्हेवाट लावली जाणार असल्याचा ठोस निर्धारही आघाडीने नोंदवला आहे.
> “जात, धर्म, पक्ष यापलीकडे — एकसंघ, पर्यावरणपूरक, शिक्षित, सुरक्षित आणि विकसित गडचांदूर घडविण्याचा आमचा निर्धार आहे.” – सचिन पांडुरंग भोयर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
आगामी निवडणुकीत या विस्तृत आणि दिशा देणाऱ्या संयुक्त जाहीरनाम्यामुळे गडचांदूरच्या मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता या आश्वासनांना नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि मतदानाच्या दिवशी मतदार कोणावर विश्वास टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



