मनपा क्षेत्रात १ लक्ष १३ हजार ३७९ नागरिकांची होणार तपासणी
कुष्ठरोग शोध मोहिमेला सुरूवात,७१ चमु करणार सर्वेक्षण

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ शहरात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असुन २६ हजार १०१ घरांमध्ये ७१ चमूंद्वारे नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी कुष्ठरोगाला ‘अधिसूचित आजार’ (notifiable disease) म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास आणि वेळेत उपचार देण्यास मदत होईल. या शोध मोहिमेसाठी आशा सेविका, पुरुष आरोग्य स्वयंसेवक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा आरोग्य विभागाद्वारे सदर मोहीम राबविण्यात येणार असुन १ लक्ष १३ हजार ३७९ नागरीकांची तपासणी करण्यात येणार आहे.
महिलांची तपासणी आशा स्वयंसेविका तसेच पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवक करणार आहे. सर्वेक्षण करण्याबाबत चमुंना कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे. चमु आपले काम योग्यरीत्या करते की नाही यावर देखरेख करण्यासाठी १३ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोहिमेच्या प्रसिध्दीकरीता मनपा क्षेत्रात घंटागाडीमध्ये ऑडिओ क्लीपद्वारे कुष्ठरोगाबाबत संदेश प्रसारीत करण्यात येणार आहे. शहरात एप्रिल २०२५ ते माहे ऑक्टोबर २०२५ पर्यंत ९७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सदर मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त नवीन रुग्णांची नोंद होण्याची शक्यता असल्याने मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी केले आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे : त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट / चकाकणारी त्वचा. त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पुर्ण बंद करता न येणे. तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे. हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोटयापासून लुळा पडणे. त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे. हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालतांना पायातुन चप्पल गळून पडणे.
सदर तपासणी मोहीमेत आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येणार असल्याने नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन – मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.



