राजुरा आगारात शहीद बिरसा मुंडांचा अवमान – आदिवासी संघटनांचा आरोप
दोषी कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
एस टी महामंडळाचे राजुरा आगार कायम चर्चेत राहत असुन दुर्दैवाने ही चर्चा सकारात्मक बाबींसाठी नसुन कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाठी होत असते हे विशेष. काही दिवसांपूर्वी राजुरा आगारातील चालक स्वतःसोबत चालक परवाना न बाळगता राजुरा ते पुसद व परत अशा लांब अंतरावरच्या कामगिरीवर गेला असल्याचे आढळुन आले होते. त्या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच राजुरा आगारातील जबाबदार कर्मचाऱ्यांनी शहीद बिरसा मुंडा ह्यांची जयंती साजरी न केल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असुन संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी आदिवासी संघटनांनी राजुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला असुन ह्या संदर्भाने विभागीय नियंत्रकांकडे तक्रार केली आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी क्रांतिकारक शहीद बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती दिनी शासन आदेशाला धाब्यावर बसवून राजुरा आगारातील जबाबदार कर्मचाऱ्यांनी जयंती साजरी केल्या गेली नसल्याचे आपली कामगिरी बजावून आगारात परत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ह्याबाबतीत विचारणा केली असता उपस्थित कर्मचाऱ्यांनी असमाधानकारक उत्तरे दिली तर काही जबाबदार कर्मचारी आगारात उपस्थित नव्हते.
आदिवासी कर्मचाऱ्यांचा रोष लक्षात घेता उपस्थितांनी आगारात शहीद बिरसा मुंडा ह्यांची प्रतिमा शोधली असता त्यांना प्रतिमा मिळाली नाही. अखेरीस सायंकाळच्या सुमारास नविन प्रतिमा आणुन माल्यार्पण करून शहीद बिरसा मुंडा जयंतीची औपचारिकता पुर्ण करण्यात आली. मात्र आगारातील वरिष्ठांनी दुर्बुद्धीने जाणुन बुजुन आदिवासी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी तसेच आदिवासी नेत्यांनी केला आहे. वास्तविक बघता महाराष्ट्र शासनाने दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये यांना राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचे कळविण्यात आले आहे. मात्र राजुरा बस आगारातील अधिका-यांना याचा विसर पडला आणि आगारात असा कार्यक्रमच घेतला नाही.
सदर प्रकारामुळे आदिवासी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असुन आदिवासी विकास परिषद सह अनेक संघटनांनी या प्रकरणी राजुरा आगारातील वाहतूक निरीक्षक इम्रान शेख, शुभांगी लाडसे तसेच चार्जमन मनोज कोल्हापुरे ह्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी ॲड. मधुकर कोटनाके, बापुराव मडावी, मनोज आत्राम, संतोष कुडमेथे, महीपाल मडावी, अभिलाष परचाके,, मुर्लीधर मेश्राम, दिपक मडावी, मधुकर टेकाम यांनी केली असून मागणी मान्य न झाल्यास अ.भा. आदिवासी विकास परिषद, अफ्रोट संघटना, टायगर सेना, आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन, गोंडीयन सहाय्यता संघटना, बिरसा ब्रिग्रेड, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी बचत गट व इतर आदिवासी संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला. तसेच ह्या संदर्भात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे. यासंदर्भात राजुरा उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांचेमार्फत आदिवासी विकास मंत्री ना. अशोक उईके व परिवहन मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
यासंदर्भात वाहतूक निरीक्षक शुभांगी लाडसे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर वाहतुक निरीक्षक इम्रान शेख ह्यांनी चांदा ब्लास्ट ला प्रतिक्रिया दिली असुन राष्ट्रीय शहीद किंवा महापुरुषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी बाबत माहिती व सूचना देणे हे आस्थापना लिपिकाचे काम असुन त्यांनी आपल्याला ह्याबाबत कुठलेही माहिती दिली नाही. नेमक्या त्याच दिवशी ते रजेवर होते त्यामुळे आम्हाला कल्पना नव्हती. तसेच आदल्या दिवशी अतिरिक्त काम असल्याने आपण रात्रभर आगारात उपस्थित राहुन नागपूर येथिल कार्यक्रमासाठी 24 बस रवाना केल्या व सकाळपासून शाळा बस फेरी पूर्ण करून मग आपण घरी गेलो असे त्यांनी सांगितले आहे.



