मनपा चंद्रपूरच्या महात्मा फुले सेमी इंग्रजी शाळेत बालक दिन उत्साहात
आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उजाळा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ महात्मा ज्योतिबा फुले सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा (मनपा चंद्रपूर) येथे १४ नोव्हेंबर रोजी बालक दिन अत्यंत उत्साहात आणि आकर्षक उपक्रमांसह साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणे, बाल आनंद मेळावा आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे वातावरण आनंदमय झाले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी फीत कापून मेळाव्याचे उद्घाटन केले,त्यांच्या प्रमुख उपस्थितीने बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन विशेष उत्साहाने पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकांता बोरकर यांनी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नेहरूंच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपूर्ण सादरीकरणे केली तसेच समूहगीतांद्वारे बालक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
शाळेत उभारलेल्या विविध उपक्रम व स्टॉलची त्यांनी सखोल पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ‘स्वतंत्र प्रयत्न, खरी कमाई आणि उद्योजकता’ याबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधील उत्साह व नावीन्यपूर्ण कल्पकतेचे त्यांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास मोठे प्रोत्साहन मिळाले असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे शिक्षकांनी सांगितले.
कार्यक्रमाला मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुनील आत्राम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षणातील उपक्रमशीलता, कुतूहल आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाचखंडे यांनी तर आभार प्रदर्शन रोहनकर यांनी केले.



