ब्रेकिंग न्यूज _ शेवटच्या दिवशी ‘एबी फॉर्म’ वरून खळबळ
दोनदा नगरसेवक राहिलेल्या उमेदवाराचा शिवसेना (उबाठा) गटावर आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या नामांकनाचा आज शेवटचा दिवस असताना गौतम नगर प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना (उबाठा) गटात जबरदस्त खळबळ उडाली. दोन कार्यकाळ नगरसेवक राहिलेले शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते विनोद महादेव वानखेडे यांना जिल्हाप्रमुखांनी ‘एबी फॉर्म’ न दिल्याने त्यांनी उमेदवारी अर्जच दाखल न करता पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले.
या प्रभागातून सलग दोन पंचवार्षिकात विजयी झाल्याने वानखेडे हे नैसर्गिकरीत्या संभाव्य उमेदवार मानले जात होते. त्यांनी उमेदवारीसाठी पूर्वतयारीसुद्धा सुरू केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नंदू पढाल यांनी दुसऱ्या उमेदवाराला तयार करून त्यांच्याशी आर्थिक देवाणघेवाण करून स्वतःला ‘एबी फॉर्म’ नाकारल्याचा ठपका वानखेडे यांनी ठेवला.
या घटनावरून उमेदवार आणि जिल्हाप्रमुख यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली असल्याची माहिती मिळते. प्रभागातील मतदारांत तसेच शिवसेना (उबाठा) गटाच्या अंतर्गत राजकारणात या प्रकारामुळे मोठी चर्चा रंगली आहे.



