भव्य शक्ती प्रदर्शनासह आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज
शारदा दुर्गम भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

चांदा ब्लास्ट
घुग्घूस : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भाजपाच्या सर्व उमेदवारांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढली त्यानंतर नगरपरिषद कार्यालयात पोहोचून सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शारदा दुर्गम यांनी अधिकृतरीत्या भारतीय जनता पक्षा तर्फे अर्ज सादर केला.
सोमवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण घुग्घूस शहरात निवडणुकीचा रंग आणला. बँक ऑफ इंडिया चौक, गांधी चौक आणि पंचशील चौक मार्गे जात ही रॅली थेट नगरपरिषद कार्यालयात दाखल झाली. ढोल-ताशांचा दणदणाट, घोषणाबाजी आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख भूमिकेचा जयघोष यामुळे परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. पक्षाचे पदाधिकारी, महिला, युवक आणि विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषद कार्यालयात पोहोचल्यानंतर सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, घुग्घूसची ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून शहराच्या भविष्याचा निर्णायक टप्पा आहे. घुग्घूसचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांतील प्रगती हीच भारतीय जनता पक्षाची प्राथमिकता आहे.
ते पुढे म्हणाले, घुग्घूसमध्ये आजवर झालेल्या कामांची यादी मोठी आहे. नागरिकांनी दाखविलेला विश्वास हा आमच्या विकासकार्यासाठी महत्त्वाचा प्रेरणास्रोत आहे. भाजपाच्या उमेदवारांमध्ये प्रामाणिकपणा, काम करण्याची क्षमता आणि जनतेशी असलेला आत्मीय संवाद हीच आमची ताकद आहे.
शारदा दुर्गम या अभ्यासू, समर्पित आणि सर्व समाजमन जिंकणाऱ्या नेत्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात घुग्घूस शहर सर्वसमावेशक विकासाची नवीन उंची गाठेल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला.
यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विवेक बोढे, घुग्घूस निवडणूक प्रमुख प्रकाश देवतळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी, महिला मोर्चा व युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



