पत्रकार शेख कदीर प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवणार.!
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांची धामधूम सुरू असताना प्रभाग क्रमांक 1 मधून पत्रकार शेख कदीर यांनी अधिकृतपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे, तरुणांमध्ये लोकप्रिय आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले शेख कदिर यांची उमेदवारी प्रभागात नवीन उत्सुकता निर्माण करत आहे.
शेख कदीर हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करत होते परन्तु सूत्रांच्या माहिती नुसार देऊळगाव राजा न प निवडणुकी साठी स्थानिक पातळीवर आता माजी आमदार डॉ शशीकांत खेडेकर व माजी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे याची नगरविकास आघाडी बनल्याचे कळते, त्यामुळे शेख कदीर हे काँग्रेस सेना उबाठा गटाकडून लढू शकतात. स्थानिक भागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, नाल्या–स्वच्छता व्यवस्था, तसेच शैक्षणिक व सामाजिक सुविधा या प्रमुख समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन शेख कदीर यांनी व्यक्त केले आहे. घराघरात जाऊन भेटीगाठी सुरू करत त्यांनी जनतेचा कौल घेण्यास सुरुवात केली असून, नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेऊन विकास आराखडा तयार करण्यावर त्यांचा भर आहे.
प्रभागातील विविध समाजघटकांकडून त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता, या निवडणुकीत शेख कदीर हे प्रबळ दावेदार ठरू शकतात,अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे.प्रभाग एक मध्ये जवळपास 3150 एकूण मतदान असून 1600 च्या जवळपास हे निर्णायक मुस्लीम मतदान आहे, त्यातच सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे शेख कदीर हे सर्वसमावेशक चेहरा म्हणून समोर येत आहे.
तरुण नेतृत्वाला संधी मिळावी, या आशेने अनेक युवकही त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसते.आगामी काही दिवसांत प्रचाराला वेग येणार असून, शेख कदीर यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 1 मधील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



