गुरुकुल महाविद्यालयात क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा येथील गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा या संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे, प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे विभाग प्रमुख प्रा. आशिष पैनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल मुसळे यांनी मार्गदर्शन केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आदिवासी बांधवांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून या आदिवासी बांधवांपैकी एक क्रांतिकारी म्हणजे वीर बिरसा मुंडा होय. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे असे मत डॉ. अनिल मुसळे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात ज्यावेळी भारतातील स्वातंत्र्य चळवळीबद्दल तसेच भारतातील क्रांतिकारकांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात येईल, त्या प्रत्येक वेळी बिरसा मुंडा यांच्या कार्याचा देखील उल्लेख केला जाईल, असे मत व्यक्त केले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक यांनी देखील आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शारीरिक व क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. आशिष पैनकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी सुशांत खिरटकर, प्रफुल मुसळे, संतोष चौधरी, प्रशांत नवले, शालिक कांबळे, सविन मडावी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.



