निमोनिया रोखण्यासाठी कृती अभियान राबविणार मनपा
बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे लक्ष्य

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : – जिल्ह्यातील ५ वर्षांखालील बालकांना निमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि यामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १२ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सामाजिक जागरूकता आणि निमोनिया निष्प्रभकरण्यासाठी कृती अभियान चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. या अभियानात नागरिक व बालकांच्या पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.
देशातील एकूण बालमृत्यूंपैकी सरसरी १६.३ टक्के मृत्यू हे निमोनियामुळे होतात. या गंभीर आजाराचा प्रतिबंध लवकर, लवकर निदान आणि उपचार यावर अभियानात भर दिला जात आहे. सन २०२५ पर्यंत बालकांमधील निमोनियामुळे होणारे बाल मृत्यूचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकांमागे ३ पेक्षा कमी करणे, निमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचारांबाबत सामाजिक स्तरावर जनजागृती, ५ वर्षांखालील बालकांमध्ये निमोनियाची लक्षणे त्वरीत ओळखणे आणि उपचार करणे, तीव निमोनियाच्या रुग्णांसाठी उपचाराकरिता आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
गृहभेटीद्वारे होणार स्क्रिनिंग –
अभियान कालावधीत आशामार्फत ५ वर्षाखालील बालकांच्या घरोघरी भेटी देऊन निमोनियाचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. निमोनिया आणि निमोकोकोअल आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी निमोकोकोअल कन्ज्यूगेट लस अत्यंत प्रभावी आहे. सार्वत्रिक लसीकरण मोहिमेंतर्गत ६ व्या आठवड्यात, १४ व्या आठवड्यात आणि ९ व्या महिन्यात बुस्टर डोस ही लस दिली जाते. सर्व बालकांनी ही लस घेण अनिवार्य आहे.
निमोनिया हा उपचार करण्यायोग्य –
आजार; निमोनिया हा उपचार करण्यायोग्य आजार आहे. वेळीच लक्षणे ओळखून त्वरित उपचार केल्यास बालमृत्यू टाळता येतात. पालकांनी आपल्या बालकांना वेळेवर लस द्यावी आणि आरोग्यसेविकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांनी केले आहे.



