जास्तीत जास्त दिव्यांगांना योजनांचा लाभ द्या
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दिव्यांग सक्षमीकरण समितीचा आढावा

चांदा ब्लास्ट
जिल्ह्यात नोंदणीकृत दिव्यांगांची संख्या ८६७८ असून दिव्यांग नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. यात स्वावलंबन कार्ड, घरकुल, एक टक्का राखीव निधी, विविध उपकरणे उपलब्ध करून देणे आदींचा समावेश आहे. या योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी योग्य नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सक्षमीकरण समितीचा तसेच मर्यादीत पालकत्व समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे, दिव्यांग महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक एम.पी.नेटे, दिव्यांग प्रतिनिधी नीलेश पाझारे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी व सक्षमीकरणाकरीता सन २०२५_२६ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १ टक्का निधीची तरतुद करण्यात आली आहे. हा निधी दिव्यांगाच्या विकासासाठी कसा आणि कुठे खर्च करायचा, याचे नियोजन करून ठेवा. जास्तीत जास्त दिव्यांग लोकांना मदत मिळेल, हे ध्येय विभाग प्रमुखांनी ठेवावे. दिव्यांगाना घरकुल योजनेतील ५ टक्के घरकुल आरक्षित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने शहरी भागात मनपा आयुक्त तसेच न.प. मुख्याधिकारी तर ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिका-यांशी योग्य समन्वय साधून दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा. दिव्यांगांचे स्वावलंबन कार्ड काढण्यासाठी विभाग प्रमुखांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
बैठकीत दिव्यांग व्यक्तींना बीज भांडवल योजना, दिव्यांग महामंडळाकडून कर्ज योजना, दिव्यांग व्यक्तिंसाठी रोजगार निर्मिती आदींचा आढावा घेण्यात आला. सादरीकरण दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले.



