रेल्वे कनेक्टिव्हिटी, औद्योगिक विकास आणि पर्यावरण रक्षणासाठी खा. धानोरकरांचा ‘त्रिसूत्री’ प्रस्ताव
जिल्ह्याच्या ठिकाणी राजधानी एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्यांना थांबा; चार जिल्ह्यांसाठी 'दुरंतो'चा वर्धा थांबा अत्यावश्यक; चांदा फोर्ट स्टेशनवर तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची लोकहितकारी मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : विदर्भातील लाखो प्रवाशांची सोय, औद्योगिक केंद्रांची राष्ट्रीय राजधानीशी जोडणी आणि पर्यावरणाचे रक्षण या त्रिसूत्रीवर भर देत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे मंत्रालयाकडे तीन अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांचा पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी २२६९१/२२६९२ बेंगळूरू-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्यांना चंद्रपूर येथे थांबा, मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर थांबा आणि चांदा फोर्ट स्टेशनवर तीन प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव केली आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सर्वप्रथम जिल्ह्याच्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे एक अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. चंद्रपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि मोठे औद्योगिक केंद्र असल्याने, २२६९१/२२६९२ बेंगळूरू-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या दोन्ही फेऱ्यांना (अप व डाऊन) चंद्रपूर स्टेशनवर तातडीने थांबा देण्यात यावा, अशी त्यांची लोकहितकारी मागणी केली आहे. देशाच्या राजधानीला जोडणाऱ्या या एक्स्प्रेस गाडीला जिल्ह्याच्या ठिकाणी थांबा न मिळणे ही येथील नागरिकांची मोठी गैरसोय आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. चंद्रपूर हे कोळसा आणि सिमेंट उद्योगांचे प्रमुख केंद्र असून, या थांब्यामुळे येथील व्यापारी, उद्योजक, अधिकारी वर्ग तसेच सामान्य प्रवाशांचा दिल्ली आणि दक्षिणेकडील बेंगळूरू शहरांशी थेट व जलद संपर्क साधला जाईल. “जिल्ह्याच्या ठिकाणी राजधानी एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्यांना थांबा मिळणे हा इथल्या नागरिकांचा हक्क आहे. हा थांबा केवळ प्रवाशांची सोय करणार नाही, तर रेल्वेच्या महसुलातही निश्चित वाढ करेल,” अशी आग्रही भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे.
यासोबतच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा रेल्वे स्थानकावर केवळ दोन मिनिटांचा थांबा देण्याची तातडीची आवश्यकता स्पष्ट केली आहे. हा एक निर्णय वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांतील प्रवाशांना थेट आणि जलद मुंबई कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देईल. सध्या या प्रवाशांना दुरंतो पकडण्यासाठी नागपूर गाठावे लागते, ज्यामुळे प्रवाशांना नागपूरपर्यंत सोडण्यासाठी दररोज १०० हून अधिक खासगी वाहने धावतात. वर्ध्यात थांबा मिळाल्यास, या वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊन नागपूर शहराचे कार्बन उत्सर्जन आणि वायू प्रदूषण प्रभावीपणे नियंत्रणात येईल, तसेच नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होईल.
यासोबतच महत्त्वाची मागणी बल्लारशाह – गोंदिया रेल्वे मार्गावरील चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर तीन प्रमुख लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना त्वरित थांबा देण्याची आहे. ज्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे, त्या गाड्यांमध्ये १७३२१/ वास्को-द-गामा – जसीडीह साप्ताहिक एक्स्प्रेस, १२८५२/ एम. जी. आर. चेन्नई सेंट्रल – बिलासपूर साप्ताहिक एसएफ एक्स्प्रेस आणि १६३६७/ काशी तामिळ संगमम एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. चांदा फोर्ट स्टेशन हे चंद्रपूर शहरानजीक असल्याने येथून प्रवासाला सुरुवात करणे बल्लारशाहपेक्षा अधिक सोयीचे ठरेल. बल्लारशाह स्टेशनवर होणारी अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी तसेच स्थानिक प्रवाशांचा प्रवासाचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी हे थांबे अत्यंत महत्त्वाचे आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे मंत्रालयाने या जनहितार्थ मागण्यांचा गांभीर्याने आणि सकारात्मक विचार करून त्वरित अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



