युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच घडणार सक्षम समाज – आ. जोरगेवार
भारतीय जनता पक्षाच्या वतीने युवती मेळावा

चांदा ब्लास्ट
आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, उद्योजकता या सर्व क्षेत्रांत स्त्रिया सक्षमपणे काम करत आहेत. मात्र, अजूनही काही ठिकाणी संधी कमी आणि अडथळे जास्त आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आजची भारतीय स्त्री कुठेच मागे नाही. परंतु केवळ यश मिळवणे पुरेसे नाही; ते टिकवण्यासाठी आत्मविश्वास, शिक्षण आणि स्वावलंबन आवश्यक आहे. युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच सक्षम समाज घडणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवती प्रमुख प्रियंका चिताडे, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, रवि गुरुनुळे, ग्रामीण तालुका अध्यक्ष विनोद खेवले, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, आशिष देवतळे, राकेश पिंपळकर, सुमित बेले, सुभाष पिंपळकर, सायली येरणे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच एक सक्षम समाज उभा राहतो. जेव्हा युवती आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सबळ होते, तेव्हा तिचं कुटुंब, तिचं गाव आणि अखेर संपूर्ण देश सक्षम बनतो. हा मेळावा केवळ कार्यक्रम नाही, तर स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. युवतींच्या जिद्दीत जग बदलविण्याची ताकद आहे. ‘मी करू शकते’, ‘मी बदल घडवू शकते’ हा आत्मविश्वास प्रत्येक युवतीच्या मनात जागा व्हावा, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘लाडकी बहिण योजना’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘मुद्रा योजना’, ‘महिला उद्योजकता विकास’ अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सन्मान मिळत आहे. तुम्ही या योजनांचा लाभ घ्या, स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि समाजात नवे आदर्श निर्माण करा, असे आवाहन त्यांनी युवतींना केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक युवती आत्मनिर्भर व्हावी, यासाठी कौशल्य विकास केंद्रे, प्रशिक्षण शिबिरे आणि स्वयंरोजगार योजना हाती घेण्यात येणार आहेत. आपण यापूर्वी ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, शिवण क्लास यांसारख्या महागड्या प्रशिक्षणांची मोफत सोय करून दिली आहे. चंद्रपूर मतदारसंघात झालेल्या ७० हून अधिक प्रशिक्षण शिबिरांमधून तीन हजारांहून अधिक महिला आणि युवतींना आपण प्रशिक्षित केले असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री हांडे यांनी केले. मेळाव्याला युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



