ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अम्मा की पढाई शिक्षण केंद्रात पुन्हा यशाचा तारा; मयूर चौधरीची केंद्रीय राखीव पोलिस दलात नियुक्ती

अम्मा की पढाई ही केवळ शिक्षण देणारी संस्था नाही तर आशेचा किरण – आ. किशोर जोरगेवार

चांदा ब्लास्ट

गरिब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे आणि त्यांनी शासकीय सेवेत रुजू व्हावे या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरू केलेल्या ‘अम्मा की पढाई’ शिक्षण केंद्रातील विद्यार्थी मयूर विकास चौधरी याची केंद्रीय राखीव पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

 स्पर्धा परीक्षांचे वाढते आव्हान आणि महागड्या खासगी प्रशिक्षणवर्गांमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांची स्वप्ने अपुरी राहतात. ही बाब लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘अम्मा की पढाई’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमात गट ब व गट क सेवांसाठी विनामूल्य मार्गदर्शन दिले जाते. सध्या २८४ विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत असून त्यांना आधुनिक पद्धतीने लेखी तसेच मैदानी चाचण्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

यापूर्वी या केंद्रातील सचिन लाकडे याची राज्यकर निरीक्षक पदावर नियुक्ती झाली होती. त्यातच आता गोंडपिपरी तालुक्यातील गरिब कुटुंबातील मयूर विकास चौधरी याने कर्मचारी निवड आयोगाच्या जीडी परीक्षेत यश संपादन करून केंद्रीय राखीव पोलिस दलात स्थान मिळविले आहे. मागील वर्षभर तो ‘अम्मा की पढाई’ केंद्रात नियमित प्रशिक्षण घेत होता.

यावेळी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, आज माझ्यासाठी हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नाही, तर एका कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीचा आणि संघर्षाच्या विजयाचा क्षण आहे. गरिब घरातील मुलांमध्ये प्रचंड जिद्द, प्रामाणिकपणा आणि मेहनतीची ताकद असते. मात्र अनेक वेळा आर्थिक अडचणींमुळे त्यांची स्वप्ने अर्धवट राहतात. ही वेदना मी जवळून पाहिली आहे. म्हणूनच ‘अम्मा की पढाई’ हा उपक्रम सुरू करण्याचा निर्धार केला होता.

मयूरसारख्या विद्यार्थ्यांनी संकटांवर मात करत, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मिळवलेले हे यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करणे, घरची परिस्थिती बदलणे आणि देशसेवेचा मार्ग स्वीकारणे—यापेक्षा मोठा अभिमान दुसरा नाही, आज मयूर केवळ आपल्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत आहे.

‘अम्मा की पढाई’ ही केवळ शिक्षण देणारी संस्था नाही. तर ती आशेचा किरण आहे. येथे प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही केवळ अभ्यासच नाही, तर आत्मविश्वास, शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा देतो. पैशाअभावी कोणाचेही स्वप्न तुटू नये, ही आमची भूमिका आहे. योग्य दिशा आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर कोणतीही उंची गाठता येते, याचा जिवंत पुरावा म्हणजे मयूर आहे.

परिस्थिती कठीण असली तरी स्वप्ने मोठी ठेवा. संघर्षाशिवाय यश नाही; पण प्रामाणिक मेहनत कधीही वाया जात नाही. भविष्यात या केंद्रातून आणखी शेकडो विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू होतील, हा माझा विश्वास असल्याचे ते यावेळी म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये