श्रद्धेची भूमी असलेल्या वढा तीर्थक्षेत्राची विकासकामांच्या माध्यमातून राज्यात ओळख निर्माण करू – आ. जोरगेवार
कार्तिकी एकादशी निमित्त वढा येथे यात्रेचे आयोजन

चांदा ब्लास्ट
विठ्ठल-रुक्मिणीच्या या पवित्र नगरीत आज हजारो भाविकांचा समुद्र जमला आहे. भक्तीचा, श्रद्धेचा आणि परंपरेचा हा सोहळा पाहून मन आनंदित झाले आहे. वढा हे केवळ गाव नाही, तर ती श्रद्धेची भूमी आहे. येथे भगवान विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती आहे, हे वढ्याचे भाग्यच आहे. येथील विकासकामांना लवकर सुरुवात होणार असून श्रद्धेची भूमी असलेल्या वढा तीर्थक्षेत्राची विकासकामांच्या माध्यमातून राज्यात ओळख निर्माण करू, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
कार्तिकी एकादशी निमित्त वढा येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी चैतन्य महाराज, वढ्याचे सरपंच किशोर वराडकर, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, राकेश पिंपळकर, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, माजी सरपंच सुनिल निखाडे, महेंद्र वडसकर, मुन्ना जोगी, संतोष भोतकर, अरुण तिखे, सायली येरणे, राशिद हुसेन, नकुल वासमवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावरून ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आपण मंजुरीसाठी पाठविला असून त्याचे आराखडे तयार आहेत. या निधीतून येथे पायाभूत सुविधा, सुशोभीकरण, रस्ते, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, विश्रांतीगृह, भाविकांसाठी निवास व्यवस्था आणि यात्रेच्या नियोजनासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
या यात्रेच्या निमित्ताने वढा नगरीत प्रचंड गर्दी होते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आपण यंदा विशेष प्रयत्न केले. यात्रेपूर्वीच बैठका घेऊन प्रशासनाचे शिष्टमंडळ येथे पाठवून नियोजन तपासले गेले. त्यामुळे यंदाच्या यात्रेत अधिकारी, ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्थांचा सुंदर समन्वय दिसून आला. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येथे भोजनदान आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
वाढत्या भाविकसंख्येमुळे वढ्याच्या विकासात आता नव्या संधी निर्माण होत आहेत.
येथे धार्मिक पर्यटन आणि रोजगारनिर्मिती होणार आहे. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली हिची महती राज्यभर पोहोचावी म्हणून आपण महाकाली महोत्सव सुरू केला. त्याला प्रचंड लोकसहभाग मिळाला. त्याच धर्तीवर वढ्याचे हे तीर्थक्षेत्रही आपण धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या उंचावणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.



