आ. जोरगेवार यांची आरोग्यमंत्र्यांना घुग्घुस ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी
मुंबई मंत्रालयात भेट, रिक्त पदे भरणे व नवीन उपकरणांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्याचीही मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्णत्वास आली आहे. मात्र, आवश्यक मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांच्या अभावी हे रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे घुग्गुस शहरासह आसपासच्या २० ते २५ गावांतील सुमारे ७० हजार नागरिकांना उपचारासाठी चंद्रपूरपर्यंत २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन घुग्घुस ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
या भेटीत आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, सार्वजनिक निधीतून उभारलेली ही आरोग्य सुविधा नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर रुजू होणे अत्यावश्यक आहे. रुग्णालयाची नवीन इमारत सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज असून, केवळ मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांच्या अभावी ती वापरात येऊ शकलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रुग्णालय तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.
रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञ अशा विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा व क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रुग्णालयासाठी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, डिजिटल क्ष-किरण मशीन, ऑपरेशन थिएटर, प्रसूतिगृह, ॲनेस्थेशिया मशीन, व्हेंटिलेटर, ईसीजी मॉनिटर यांसारख्या आधुनिक उपकरणांची तात्काळ खरेदी करावी, असेही त्यांनी सांगितले.
आ. जोरगेवार यांनी पुढे सांगितले की, या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास घुग्घुस ग्रामीण रुग्णालय लगेच कार्यान्वित होऊन परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आणि तात्काळ आरोग्य सेवा मिळेल. त्यामुळे नागरिकांना जिल्हा मुख्यालयावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि ग्रामीण आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल. ना. प्रकाशजी आबिटकर यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे.
					
					
					
					
					


