राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरण होणार
खा. धानोरकर यांच्या प्रयत्नांला यश

चांदा ब्लास्ट
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित पदांवर समायोजन करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. या निर्णयामागे खासदार प्रतिभा धानोरकर (तत्कालीन आमदार, वरोरा विधानसभा क्षेत्र) यांचा विधानसभेत केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांची मोठी भूमिका आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, अभियानात १४ मार्च २०२४ रोजी दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर समायोजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, सेवा प्रवेश नियमांत दुरुस्ती न करता, ही बाब एक-वेळची म्हणून विचारात घेतली जाणार आहे. तसेच, सार्वजनिक आरोग्य विभागातील पदांबरोबरच ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेतील रिक्त पदांबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार असताना प्रतिभा धानोरकर यांनी सर्वप्रथम हा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा ज्वलंत प्रश्न विधानसभेत मांडला होता. आमदार म्हणून आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत आवाज उठवला आणि सरकारकडे पाठपुरावा केला. या संदर्भात लक्षवेधी लावून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे आणि ठाम भूमिकेमुळे शासनाने अखेर सकारात्मक निर्णय घेतला असून, हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, “मी आमदार असताना विधानसभेत ज्या मागण्यांसाठी लढा दिला, त्या आता पूर्ण होताना पाहून समाधान वाटते. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून शासनाची सेवा करत आहेत आणि त्यांचे नियमितीकरण हा त्यांचा हक्क आहे. माझ्या प्रयत्नांमुळे सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडता आले, याचा मला अभिमान आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.”
					
					
					
					
					


