चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलला ‘पद्मविभूषण स्व. रतन टाटा’ यांचे नाव देण्याची खा. धानोरकर यांची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन लोकहितकारी मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे मध्य भारतातील सर्वात मोठे कर्करोग निदान आणि उपचार रुग्णालय उभारले जात आहे. या मानवतावादी आणि महत्त्वपूर्ण प्रकल्पात उद्योगपती आणि थोर दानशूर व्यक्तिमत्त्व पद्मविभूषण स्व. रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या अत्याधुनिक रुग्णालयाला ‘पद्मविभूषण स्व. रतन टाटा कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन ही लोकहितकारी मागणी केली आहे आणि राज्य सरकार तसेच टाटा ट्रस्टकडे विशेष आग्रह धरला आहे.
स्व. रतन टाटा यांनी चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात एवढे मोठे आणि अद्ययावत रुग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घेतला, ज्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील लाखो गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले की, रतन टाटा हे चंद्रपूरच्या माता महाकालीच्या पावन भूमीवर येऊन गेले आहेत, ज्यामुळे चंद्रपूरकरांसाठी हा प्रकल्प अधिक महत्त्वपूर्ण ठरतो.
खासदार धानोरकर म्हणाल्या, “रतन टाटा हे केवळ मोठे उद्योगपती नाहीत, तर ते माणुसकी आणि निस्वार्थ समाजसेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी चंद्रपूरला दिलेले हे रुग्णालय विदर्भासाठी एक वरदान आहे. त्यांच्या या महान योगदानाचा यथोचित गौरव करण्यासाठी, या रुग्णालयाला त्यांचे नाव देणे ही कृतज्ञता व्यक्त करण्याची योग्य पद्धत ठरेल.”
त्यांच्या नावाने हे रुग्णालय ओळखले गेल्यास, ते रतन टाटांच्या समाजसेवेच्या विचारांना कायम प्रेरणा देत राहील आणि इतरांनाही सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देईल, असे भावनिक आवाहनही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.
					
					
					
					
					


