शिक्षणातील आव्हाने आणि आपली भूमिका यावर एक दिवसीय कार्यकर्ता शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट
शिक्षण बचाव समन्वय समिती व लोकसंघ सोशल एज्युकेशन मूव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षणातील आव्हाने आणि आपली भूमिका” या विषयावर एक दिवसीय कार्यकर्ता शिबिर आज ब्राइट इंग्लिश स्कूल, चंद्रपूर येथे यशस्वीपणे पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. योगिता रायपूर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्तावना प्रवीण कुमरे सर (समन्वयक, अध्यक्ष मंडळ, शिक्षण बचाव समन्वय समिती, विदर्भ) यांनी केली, तर सूत्रसंचालन उमाकांत तिपर्तीवार सर यांनी केले.
शिबिराचे प्रमुख अतिथी मा. रमेश बिजेकर सर, समन्वयक, शिक्षण बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र यांनी “शिक्षणातील आव्हाने आणि आपली भूमिका” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच मा. अपेक्षा दिवाण मॅडम, प्रतिनिधी सचिव मंडळ, शिक्षण बचाव समन्वय समिती, विदर्भ यांनी “शाळा बंदीचा प्रश्न आणि शिक्षण धोरण” या विषयावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रभाकर गेडाम सर, समन्वयक अध्यक्ष मंडळ, शिक्षण बचाव समन्वय समिती, विदर्भ होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समितीची संघटनात्मक रचना, भूमिका व तिचे महत्व यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
शिबिरात गटचर्चा आणि कृती कार्यक्रम सत्र आयोजित करण्यात आले होते. सहभागींचे चार गट करण्यात आले, ज्यात खालील विषयांवर चर्चा झाली —
संघटनात्मक बांधणी
कृती कार्यक्रम – शाळा वाचविण्याचे उपाय
शिक्षण विनामूल्य असावे का?
शाळा वाचविण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका
प्रत्येक गटातील प्रतिनिधींनी त्यांच्या निष्कर्षांचे सादरीकरण केले.
शिबिराच्या शेवटी प्रश्नोत्तर व चर्चा सत्र पार पडले.
शेवटी हरिदास गौरकार सर यांनी आभार प्रदर्शन केले.
या शिबिराद्वारे शिक्षण क्षेत्रातील वर्तमान आव्हाने, शासन धोरणे, आणि संघटनात्मक उपाययोजनांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली.



