ई – लायब्ररीच्या ज्ञानार्जनातून ब्रह्मपुरीचे वीर स्पर्धा परीक्षेत इतिहास रचणार – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार
ब्रम्हपुरी येथे अद्यावत सुविधा असलेल्या ई - लायब्ररीचे थाटात लोकार्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
समाधान ही आयुष्याची शिदोरी आहे. जो इतरांना आनंद देतो त्यातून मिळणाऱ्या समाधानाची मोल अमूल्य आहे. मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक मानवाला समाजाचे देणे असते. यातूनच मला मिळालेली लोकप्रतिनिधी या नात्याने लोकसेवेची संधी ही सार्थक ठरविण्याकरिता मी सदैव प्रयत्नशील असतो. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुरी येथील अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून प्राविण्य मिळविले. मात्र शैक्षणिक सोयींचा अभाव व महागडे शिक्षण घेणे परवडण्यासारखे नसल्यामुळे व ग्रामीण भागातील गोरगरीब होतकरू तरुण यांना उज्वल भविष्याची वाट दाखविणारे ज्ञानकेंद्र म्हणून ई-लायब्ररी उभारण्यासाठी प्रयत्न चालविले व आज त्याचे यशात रूपांतर झाले. हा ऐतिहासिक क्षण मी कदापिही विसरू शकणार नाही. याचा मला अभिमान आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये विदर्भातील शिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा व प्रशासकीय सेवेत उच्च स्थानी येथील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करावे हा त्यामधील हेतू आहे असे प्रतिपादन विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपूरी येथील तहसील कार्यालयाच्या मागील परिसरात १० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या ई-लायब्ररीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, ज्येष्ठ काॅंग्रेस नेते डॉ देविदास जगनाडे, माजी प्राचार्य डॉ.नामदेव कोकोडे, राष्ट्रीय समन्वयक काॅंग्रेस ओबीसी सेल गोविंदराव भेंडारकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ थानेश्वर कायरकर, शहर कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, प्रा.सुभाष बजाज, माजी नगरसेवक डॉ नितीन ऊराडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष योगेश मिसार, आर्कीटेक्चर श्रीवास्तव, कंत्राटदार राजू धोटे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, मागील दहा वर्षात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात मी केलेल्या अनेक विकास कामांमुळे आज संपूर्ण ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला असून आपण मतदान रुपी दिलेला आशीर्वाद व विकासाला दिलेली साथ याचा मी सदैव ऋणी आहे. आज विद्यार्थ्यांच्या सेवेतील लायब्ररीचे लोकार्पण करण्यात आले. या अद्यावत व वातानुकूलित इ लायब्ररी मध्ये सेवानिवृत्त वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून ज्ञान मिळवणे व स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवणे सहज सोपे होईल. या अभ्यासिकेमध्ये आवश्यक ती पुस्तके उपलब्ध केल्या जाईल तसेच कुठल्याही निधीची कमतरता भासली तर ती माझ्या मानधनातून त्याची पूर्तता करेन. ब्रह्मपुरी शहरात नागरिकांकरिता शुद्ध पेयजल, प्रशस्त प्रशासकीय इमारती, क्रीडा संकुलाचा विकास, भूमिगत गटार पाईपलाईन, प्रशस्त असे सांस्कृतिक सभागृह, यासह अनेक विकास कामे केली आहेत. आपली साथ नेहमी विकासासोबत राहील अशी अपेक्षा बाळगून मी सदैव आपल्या सेवेत राहुन भविष्यात या ब्रह्मपुरी शहरासह संपूर्ण विधानसभा क्षेत्राला राज्याच्या विकसनशील क्रमवारीत अग्रेसर मतदार संघ म्हणून ओळखल्या जाणार अशी ग्वाही देतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.



