ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दाताळा येथील क्रीडा संकुल उभारणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

आ.मुनगंटीवार यांचा निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा

चांदा ब्लास्ट

“स्वातंत्र्यवीर स्वर्गीय वीर बाबुराव शेडमाके क्रीडा संकुल” प्रकल्पाला मिळाली गती

चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा दाताळा येथे उभारण्यात येणाऱ्या “स्वातंत्र्यवीर स्वर्गीय वीर बाबुराव शेडमाके क्रीडा संकुल” या अत्याधुनिक क्रीडा प्रकल्पास गती मिळाली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे वर्षा निवासस्थानी भेट घेऊन या प्रकल्पासंदर्भात निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या निवेदनावर सकारात्मक भूमिका घेत प्रधान सचिव क्रीडा यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

नवीन चंद्रपूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 152 अंतर्गत स्टेडियम कॉम्प्लेक्स म्हणून राखीव असलेली 16 एकर जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग (क्रमांक 2, चंद्रपूर) यांच्या मार्फत ₹137 कोटींचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा, प्रशिक्षण केंद्रे, इनडोअर आणि आउटडोअर स्टेडियम तसेच आधुनिक क्रीडांगणे उभारली जाणार आहेत.

वीर बाबुराव शेडमाके सभागृह प्रकल्पासाठी यापूर्वी राज्य शासनाकडून ₹25 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. महाकाली मंदिर विकासासाठी ₹60 कोटी निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध आहे. या दोन्ही प्रकल्पांबाबत पुरातत्व विभागाने काही तांत्रिक बाबी उपस्थित केल्यामुळे, एकूण ₹85 कोटींचा निधी दाताळा येथील क्रीडा संकुलासाठी वापरण्याची परवानगी देण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

उर्वरित ₹52 कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावा. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे चंद्रपूर व पूर्व विदर्भातील क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांना नवे बळ मिळणार आहे. “मिशन शौर्य एव्हरेस्ट” अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आदिवासी युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळाले आहे. या मोहिमेतील पाच आदिवासी युवकांनी एव्हरेस्ट शिखर सर केले होते, ज्यांचा पंतप्रधान देशगौरव नरेंद्रजी मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात विशेष उल्लेख करून गौरव केला होता. या प्रकल्पामुळे “मिशन ओलंपिक 2036” साठी चंद्रपूर जिल्ह्यातील नव्या पिढीतील खेळाडू घडतील आणि ते आपली क्रीडा कामगिरीद्वारे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवतील, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेत प्रशासकीय मान्यतेसाठी तत्काळ प्रधान सचिव क्रीडा यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून, चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने हा टप्पा ऐतिहासिक ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये