अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या
आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या मदतीची मागणी

चांदा ब्लास्ट
मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चंद्रपूर :_ राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अवकाळी पावसामुळे पिके उध्वस्त झाल्यानंतर शेतकरी हवालदिल झाला. अश्या परिस्थितीत त्यांच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
29 ऑक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे धान, कापूस, सोयाबीनसह इतर खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त झाला. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीची गंभीर दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आधार देऊन त्याच्या कष्टाला न्याय मिळवून देणे हेच आपले कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रत्येक घामाचा थेंब मोलाचा असून त्यांच्या नुकसानीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा, हा माझा ठाम आग्रह असल्याचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.



