मतदार नोंदणी लोकशाही बळकट करण्याचे साधन – आ. जोरगेवार
राजमाता निवासस्थानी पदवीधर मतदार नोंदणी अभियानाची आढावा बैठक

चांदा ब्लास्ट
पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचे महत्त्व लक्षात घेता आज गुरुवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत मतदार नोंदणी अभियानाची सविस्तर माहिती, प्रगती आणि उर्वरित कामांवर चर्चा करण्यात आली. पदविधर नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शहर ते बुथ पातळीवर नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, शहर महिला आघाडी अध्यक्षा छबु वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, महामंत्री मनोज पाल, श्याम कनकम, रवि गुरुनुले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व मंडळ अध्यक्ष आणि विविध आघाडी अध्यक्ष उपस्थित होते.
बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, पदविधर मतदारसंघ हा सुशिक्षित समाजाचा आवाज आहे. त्यामुळे प्रत्येक पदवीधर नागरिकाने आपली नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
मतदार नोंदणी हा केवळ अधिकार नसून लोकशाही बळकट करण्याचे प्रभावी साधन आहे, असेही त्यांनी नमूद केले.
त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत जाऊन त्यांची नोंदणी सुनिश्चित करा. हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून लोकशाहीच्या जडणघडणीचा भाग आहे. आमदार जोरगेवार पुढे म्हणाले की, मतदारसंघातील तरुण पदवीधर, शिक्षक, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचून जागरूकता वाढविणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे
नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून सुलभ करण्यात आली आहे. नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे, असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी केले.
 
					 
					 
					 
					 
					


