ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराज यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराजांच्या आश्विन उत्सवांची सुरूवात घटस्थापनेने होऊन नंतर मंडपोत्सव, पालखी मिरवणूक व शेवटी आश्विन लळीताने सांगता झाली. आश्विन लळीतोत्सवापासून म्हणजेच १० ऑक्टोंबर पासून श्री बालाजी महाराज यात्रेस सुरुवात झाली. खरेतर यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ओल्या दुष्काळाच्या सावटामुळे यात्रेवर याचा काहीसा परिणाम होईल असे वाटत होते. परंतु श्री बालाजी महाराज यांच्या कृपेने आपल्या घरात कशाचीच कमी पडणार नाही, या श्रद्धेपोटी भक्तांनी देऊळगाव राजा नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यात्रेतील रहाटपाळण्यांच्या जागांचा प्रश्न जागावाटप समितीचे सर्व सदस्य, श्री बालाजी संस्थान, महसूल विभाग व पोलीस विभाग यांनी अनेक सभा घेऊन मार्गी लावला. यावर्षी व्यापाऱ्यांना रहाटपाळण्यांसाठी लिलाव पद्धतीने जागावाटप केल्याने, या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत झाले.

यात्रेच्या जागेतील काही अतिक्रमण नगरपरिषदेने काढून दिले. जागावाटप समिती सदस्य जगदीश कापसे, गोविंदराव झोरे, वसंतआप्पा खुळे, मधुकर रायमूल, सुरज गुप्ता, विनोद जैस्वाल, नवनाथ गोमधरे, सुनील शेजुळकर, निशिकांत भावसार, अमर शेटे तसेच श्री बालाजी संस्थानचे प्रतिनिधी आशिष वैद्य यांनी अहोरात्र मेहनत घेऊन यात्रेतील उपलब्ध जागेचा नियोजनबद्ध उपयोग करून यात्रेमध्ये सुमारे ३०० छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आपली दुकाने थाटण्यास मदत केली. जागावाटप समिती सदस्यांनी त्यांचे काम २० सप्टेंबरला सुरू केले आणि व्यावसायिकांना यात्रेतील जागेसाठी अर्ज करण्याची तारीख व ठिकाण यासंदर्भात माहिती प्रदर्शित केली. जागावाटप समिती सदस्यांनी एकत्र येऊन दि.५ ऑक्टोबर रोजी यात्रेतील दुकानांच्या जागांची व रस्त्यांची आखणी करण्यास सुरुवात केली व त्यानंतर दररोज तेथे एकत्र जमून व्यावसायिकांना सर्व ती मदत केली. यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली तसेच दीपावली पाडव्याच्या दिवशी पाऊस पडून चिखल झाल्यामुळे यात्रा परिसरात तात्काळ मुरूम टाकण्यात आला.

यात्रेमध्ये प्रसादांच्या दुकानासह खेळण्याची दुकाने, भांड्यांची दुकाने, महिलांसाठी विविध वस्तूंची दुकाने, मोठमोठे रहाट पाळणे, ब्रेक डान्स व खाद्यपदार्थ अशा विविध व्यवसायिकांनी यात्रेला पसंती दिली व आपले व्यवसाय मांडले. कास्तकार, व्यापारी, नोकरदार वर्ग, युवक, महिला व बालगोपाल या सर्वांनीच मोठ्या संख्येने यात्रेचा आनंद घेतला.

श्री बालाजी महाराज यात्रा ही परिसरातील सर्वात मोठी व सर्वाधिक काळ चालणारी यात्रा असल्याने विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भाविक श्रींचे दर्शन घेण्यासाठी व यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यात्रेतील सर्व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मागील दोन वर्षांपासून यात्रेतील व्यावसायिकांची दुकाने रात्री १० ऐवजी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी श्री बालाजी संस्थानने मिळवल्यामुळे यात्रेतील व्यावसायिकांचा व्यवसाय चांगला झाला तसेच शहरातील व परिसरातील यात्रेकरूंना आपापली कामे सांभाळून यात्रेचा भरपूर आनंद घेता आला.

श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी यात्रेतील व्यवस्थेची पाहणी करून व्यावसायिकांना पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात यात्रा भरविण्याचे आवाहन केले. जागावाटप समितीने केलेल्या सहकार्यामुळे व्यावसायिकांनी जागावाटप समिती सदस्य तसेच विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. सध्या कार्तिक यात्रा उत्सव सुरू असून दि.31 ऑक्टोंबर रोजी कार्तिक मंडपोत्सव, दि. 3 नोव्हेंबर रोजी दिपोत्सव व दि. 16 नोव्हेंबर रोजी कार्तिक लळीताने श्रीजींच्या वार्षिक उत्सवांची सांगता होणार असल्याचे, श्री बालाजी संस्थानने जाहीर केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये