ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर विमानसेवेच्या नव्या युगाची पायाभरणी!

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा

चांदा ब्लास्ट

मोरवा विमानतळ ‘उडान योजना’मध्ये समाविष्ट करण्याची मागणी

विमान सेवेमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळेल नवा वेग

चंद्रपूर : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि विदर्भातील औद्योगिक, पर्यटन व आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उचलले आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु नायडू जी यांना पत्र लिहत आ.मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाला उडान योजनेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच चंद्रपूरहून पुणे, मुंबई आणि दिल्ली अशा प्रमुख महानगरांसाठी विमान सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे.

आ. मुनगंटीवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कोळसा, वीज, सिमेंट, पेपर आणि बांबू उद्योगांचा केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, बल्लारपूर पेपर मिल, फेरो अलॉयज, धारीवाल,वर्धा पॉवर, जीएमआर प्रकल्प अशा अनेक मोठ्या औद्योगिक व ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे हा जिल्हा राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा ठरला आहे. परंतु हवाई संपर्काचा अभाव असल्याने या भागातील नागरिक, उद्योजक, अधिकारी, तसेच परदेशी पर्यटक यांना नागपूर व इतर शहरांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे वेळ, पैसा वाया जातो.

आ. मुनगंटीवार यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, चंद्रपूर शहरापासून फक्त 9 किमी अंतरावर असलेले मोरवा विमानतळ भौगोलिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल आहे. सध्या येथून C90,AB 200, CJ1 ही विमाने आणि सर्व प्रकारची हेलिकॉप्टरचे उड्डाण शक्य आहे. परंतु 700 मीटर हवाई धावपट्टीचा विस्तार केल्यास प्रवासी विमानसेवा सुरू करणे शक्य होईल. तेव्हा हा प्रकल्प ‘उडान योजना’मध्ये समाविष्ट करून आवश्यक निधी व परवानगी देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

चंद्रपूर जिल्हा हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प, वन पर्यटन, धार्मिक स्थळे व औद्योगिक प्रकल्पासाठी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. अशा वेळी विमानसेवा सुरू झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला नवा वेग मिळेल, पर्यटन व गुंतवणूक वाढेल आणि नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की,चंद्रपूरसाठी लघु प्रवासी विमान सेवा ही केवळ वाहतुकीची सोय नाही, तर विकासाच्या नव्या युगाची सुरुवात आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांकष विकास व्हावा यासाठी कायम प्रयत्नशील असणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा चंद्रपूरकरांसाठी विकासाची उड्डाण मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. मोरवा विमानतळाच्या लघु प्रवासी विमान सेवेसाठीचा हा पाठपुरावा चंद्रपूरच्या प्रगतीला नव्या क्षितिजांकडे नेणारा ठरेल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये