चांदा पब्लिक स्कूल मध्ये प्राथमिक उपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – लीना पिपरोडे यांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट
चांदा पब्लिक स्कूलमध्ये वर्ग सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्राथमिक उपचार प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरासाठी प्रमुख प्रशिक्षिका म्हणून लीना पिपरोडे, मास्टर ट्रेनर सेंट जॉन ए.आय.ए., मुंबई या उपस्थित होत्या. तसेच अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांची उपस्थिती होती.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना अपघाताच्या प्रसंगी कशी प्रतिक्रिया द्यावी, कोणते प्राथमिक उपचार आवश्यक असतात आणि सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलावीत यांचे मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत शांत राहून निर्णय घेण्यावर विशेष भर देण्यात आला.
चार सत्रात राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना स्वतःची आणि इतरांची सुरक्षा कशी सुनिश्चित करावी याविषयी मूलभूत माहिती व सुरक्षा जागरुकता, सी.पी.आर. तंत्राची माहिती आणि मॅनिकिन्सच्या साहाय्याने प्रत्यक्ष सराव घेण्यात आला. तिस-या सत्रात कट, चिरणे, भाजणे, मोच अशा किरकोळ दुखापतींचे व्यवस्थापन शिकविण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थितींचे सिम्युलेशन, स्थलांतर प्रक्रिया आणि भूमिका साकारुन विद्यार्थ्यांना वास्तविक परिस्थितीचा अनुभव दिल्या गेला व विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधण्यात आला.
आजच्या पिढीतील मुलांनी आपात्कालीन परिस्थितीत प्राथमिक उपचार प्रशिक्षण घेऊन सतर्क, आणि आत्मविश्वासपूर्ण सज्ज असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांची योग्य वेळेची कृती मोठा फरक घडवू शकते. असे मत शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांचे आहे. म्हणून शाळेत प्राथमिक उपचार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. “अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि संकटसमयी मदत करण्याची क्षमता विकसित होते”, असे प्रतिपादन प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीची विद्यार्थीनी मरियम जीवानी हिने केले तर कार्यक्रम प्रमुख महेश गौरकार व स्मृती मून यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता परिश्रम घेतले.



