अखेर पालगाववासीयांच्या नरकयातनांना दिलासा
अल्ट्राटेक सिमेंट आवरपूर तर्फे दोन कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
गेल्या चार दशकांपासून पालगाव ते अल्ट्राटेक माईन्स गेट या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी अक्षरशः जीवघेणी लढाई लढली. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज प्रवास करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना, कामगार बांधवांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनासह अल्ट्राटेक व्यवस्थापनाकडे निवेदने सादर केली, आंदोलने केली, परंतु तरीही या प्रश्नावर दीर्घकाळ कोणताही तोडगा निघू शकला नाही.
शेवटी पालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण रागीट आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने, तसेच विद्यमान आमदार श्री. देवराव भोगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दोन ठोस आंदोलनांमुळे हा प्रश्न निर्णायक टप्प्यात गेला. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासन नरमले आणि नागरिकांची बहुप्रतीक्षित व न्याय्य मागणी पूर्णत्वास आली.
काल झालेल्या भव्य भूमिपूजन कार्यक्रमात दोन कोटी रुपयांच्या खर्चाने माईन्स ते पालगाव रस्ता बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या क्षणाचे साक्षीदार होताना ग्रामस्थांच्या डोळ्यांत समाधानाश्रू दाटून आले. हा दिवस पालगावच्या इतिहासात सुवर्णक्षण म्हणून कोरला जाईल, असे अनेकांच्या भावना व्यक्त झाल्या.
आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,“गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांची जी व्यथा मी पाहिली, ती मला नेहमीच अस्वस्थ करत होती. या रस्त्याच्या मागणीसाठी मी स्वतः आग्रही भूमिका घेतली आणि आज त्याचे फळ मिळाले आहे. हा रस्ता केवळ एक सोयीचा मार्ग नसून, पालगाववासीयांच्या संघर्षाचे आणि ऐक्याचे प्रतीक आहे.”
या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे, पालगाव सरपंच अरुण रागीट, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे युनिट हेड श्रीराम व नमित मिश्रा, गडचांदूर भाजपाध्यक्ष अरविंद डोहे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, तसेच स्थानिक सामाजिक व राजकीय नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ग्रामस्थांमध्ये पुरुषोत्तम आस्वले, रवी बंडीवार, सतीश जमदाडे, ललित देवपूरा, सोदीप घोष, दिपक सुराणा, पवन यादव, बिभीषण कुंभारे, प्रमोद वाघाडे, गणेश लोंढे, महादेव मडावी, लालचंद नगराळे, गौतम खोब्रागडे, पांडुरंग रागीट, सिद्धार्थ कुंभारे, नरेंद्र मडावी, माया मडावी आदींसह शेकडो लोक उत्साहाने सहभागी झाले.