मुख्यमंत्री दौरा अन् तेलवासा रोडच्या डागडुगीला सुरुवात
तेलवासा ते सुमठाना मार्गाची दुरवस्था : आतापर्यंत प्रशासन निद्रेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मुख्यमंत्र्यांचा दौरा : प्रशासनाची तेलवासा मार्ग दुरुस्तीची लगीन घाई
भद्रावती तालुक्यातील तेलवासा, ढोरवासा परिसरातील न्यू,ग्रेटा एनर्जी लि. व न्यू. एरा क्लिंनटेक कंपनीच्या भूमिपूजना करीता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कोळशा व खान मंत्री जी किशन रेड्डी यांचे उद्या दिनांक १४ रोजी आगमन होत आहे. आगमनाच्या वेळी ग्रामीण रस्ते तेथील परिस्थिती सर्वच आलबेल असल्याचे भासवण्याकरिता प्रशासनाची युद्धपातळीवर लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तेलवासा ते सुमठाना मार्गाच्या दुरुस्ती चे ग्रामस्थांचे रडगाणे यापूर्वी कधीच कानावर गेले नाही. अपघात झाले, काही मेले कित्येक गंभीर दुखापतग्रस्त झाले, आंदोलने झालीत उलटपक्षी गावकऱ्यावरच खटले भरल्या गेली मात्र लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाने निधीचे रडगाणे गात सपशेल दुर्लक्ष केले.
मात्र राज्याचे मुख्यमंत्री दाखल होत आहे हे कळताच दौरा असलेला मर्यादित मार्ग दुरुस्ती च्या कामात लागला.कंपनी सह सबंधित विभाग व यंत्रणा आपले अपयश लपविण्यासाठी रात्र कमी सोंगे अधिक या म्हणीला अनुसरून कामाला लागला असल्याचा प्रत्यय या मार्गावर कधी नव्हे ते आज दिसून आला.
राज्याच्या उच्चपदस्थ व्यक्तींना एक न्याय आणि ग्रामस्थांना एक न्याय हे उपरोधिक धोरण संतापजनक असल्याचे ग्रामस्थ बोलू लागले आहे.
किमान या निमित्याने फक्त दिखावा न करता सरळ तेलवासा ते सुमठाना मार्गाची मजबूत दुरस्ती करून पंचक्रोशीतील ग्रामस्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


