दिवाळीपूर्वी वेतन अदा करा
आ.अडबाले यांची प्रधान सचिवांकडे मागणी

चांदा ब्लास्ट
दि. १८ ऑक्टोंबर २०२५ पासून दिवाळीचा सण सुरु होत आहे. देशासह राज्यात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास बहु. कल्याण व कौशल्य व उद्योजकता विभागाअंतर्गत कार्यरत / सेवानिवृत्त सर्व शिक्षक, प्राध्यापक, सर्व निदेशक व कर्मचारी यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी पाचही विभागाच्या प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, आयटीआय येथे कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिवाळी हा सण आनंदाने साजरा करता यावा, याकरिता दिनांक १८ ऑक्टाेंबर २०२५ पूर्वी वेतन होणे आवश्यक आहे. त्यामुळे नेहमी शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी झटणारे आमदार सुधाकर अडबाले यांनी सदर कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी व्हावे, याकरिता पाचही विभागाकडे मागणी केली आहे.
सदर कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबरचे वेतन दिनांक १८ ऑक्टाेंबर २०२५ पूर्वी त्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत वेतन तरतूद तात्काळ उपलब्ध करून द्यावी व दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्याबाबत संबंधितांना आदेश निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास बहु. कल्याण व कौशल्य व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.