कारवाई दरम्यान सावंगी पोलीसांवर हल्ला करणारा हल्लेखोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २६.०९.२०२५ रोजी सावंगी पोलीस हे बोरगाव मेथे येथील शिख बेड्यावर जुगार कारवाई करता गेले असता, जुगार चालविणारा अट्टल गुन्हेगार राजकुमार बावरी याने कारवाई दरम्यान पोलीसांवर प्राण घातक हल्ला चढवून जुगार कारवाईस विरोध करून घटनास्थळा वरून पसार झाला होता.
सदर गुन्हेगार हा घटने तारखेपासुन फरार असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या मार्गदर्शनात दोन पथके तयार करून सदर आरोपी शोध कामी रवाना केले. दोन्ही पथकांनी सदर आरोपीचा बुट्टीबोरी, नागपूर, अमरावती, अकोला तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेत असता, सदर आरोपी आपले राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत आहे व एका जागेवर राहत नसल्याचे दिसून आले. त्याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली की, सदर आरोपी हा इंदोर (मध्य प्रदेश) येथे गेला असून तेथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने दोन्ही पथके इंदोर (मध्य प्रदेश) येथे रवाना होऊन राजकुमार बावरी याचे शोधार्थ इंदोर येथील हॉटेल, लॉजेस, रेल्वे स्टेशन परिसर बस स्टॉप परीसर पिंजून काढत असता, माहिती मिळाली कि, एक नवीन अनोळखी शीख इसम हा ट्रान्सपोर्ट लाईन, इंदोर येथील एका लॉजमध्ये राहत आहे, त्यावरून ट्रान्सपोर्ट नगर, इंदोर येथील चमन लॉज येथे घेराव टाकुन लॉजची पाहणी केली असता आरोपी राजकुमार बेतनसिंग बावरी, वय ३२ वर्ष, रा. शिख बेडा, बोरगाव (मेघे), वर्धा हा दिसुन आल्याने पोलीसांना पाहुण पळण्याचा प्रयत्न केला असता त्यास पाठलाग करुन ताब्यात घेऊन वर्धा येथे परत येऊन पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) याचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे पो. उपनी राहुल इटेकार, प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार हमीद शेख, शेखर डोंगरे, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, मंगेश चावरे, विकास मुंढे, दिनेश बोधकर, विशाल मडावी यांनी केली.



