ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळामध्ये भारतीय जैन संघटना शेतकर्‍यांच्या पाठीशी

अॅक्शन प्लॅन तयार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारतीय जैन संघटनेच्या माध्यमाने संस्थापक श्री. शांतिलालजी मुथ्था यांनी, महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती संदर्भात दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी ऑनलाइन मिटिंग आयोजित केली होती. सदर बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला, राज्याध्यक्ष केतन शहा,राज्यमहासचिव प्रवीण पारख, मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनीही मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील सर्वच पूरग्रस्त जिल्ह्यातील तालुका व जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या तालुक्याची भीषण परिस्थिती विशद केली. भारतीय जैन संघटना ही मागील ४० वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वच संकटग्रस्त व शेतकरी वर्गाला सातत्याने सहकार्य करीत आलेली आहे. यावेळीही सर्वच कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन काही ठोस निर्णय घेण्यात आले आहेत व अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.

प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यामध्ये सकल जैन समाजाची बैठक बोलवून बीजेएसचा अॅक्शन प्लॅन त्यांच्या समोर ठेवणे व सर्वांचे सहकार्य मिळेल हे सुनिश्चित करणे.

1. प्राथमिकतेने करायची कामे :

पूरग्रस्त भागात विस्थापितांना जेवण-खावण पुरविणे

जैन समाजातील किंवा इतर डॉक्टर यांच्याशी संपर्क करून वैद्यकीय सेवा पुरविणे

 जिल्हा पातळी व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांची फळी तयार करून त्यांनी करावयाच्या कामाचा अॅक्शन प्लॅन तयार करणे

मंदिर किंवा स्थानकमध्ये संपर्क करून त्या ठिकाणी जीवदया संदर्भात जनावरांना चारा देण्यासाठी काय सहकार्य मिळू शकते याबद्दल चर्चा करून निर्णय घेणे

जैन समाजातील स्थानिक संस्था किंवा इतर स्वयंसेवी संस्थांबरोबर या आपत्तीमध्ये काम करण्याची परवानगी बीजेएसच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे

२) अ) या पुरपरिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी मनुष्यहानी झालेली आहे. अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांच्या मुला-मुलींची इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यन्तची शिक्षणाची जबाबदारी बीजेएस स्वीकारत आहे.

ब) गेल्या १-२ वर्षात महाराष्ट्रातील अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुला-मुलींना इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शैक्षणिक पुनर्वसनासाठी वाघोली येथे आणण्यात येईल.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात यावा.

३) पुरामध्ये शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतकर्‍यांच्या मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा उरलेला नाही. त्यामुळे इतर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. या भयंकर संकटातून मार्ग काढण्यासाठी हा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला व यावर उपाय म्हणून अशा शेतकर्‍यांच्या मुला-मुलींसाठी पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये जिल्हा पातळीवर सामूहिक विवाहाचे आयोजन डिसेंबर- जानेवारी महिन्यात करण्यात यावे, असा ठोस निर्णय घेण्यात आला. जेणेकरून शेतकर्‍यांना एक मोठा आधार मिळेल व काही प्रमाणात तरी आत्महत्या रोखण्यात यश मिळू शकेल. त्यासाठी साखर कारखाने व इतर स्थानिक संस्थाचे सहकार्य घेण्याचाही एकमताने निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्व पूरग्रस्तांच्या संदर्भात मदत कार्य करण्यासाठी, बीजेएसचे महाराष्ट्र राज्यमहासचिव श्री. प्रवीण पारख यांना प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून या संपूर्ण कार्याचे को-ऑर्डीनेशन राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नंदकिशोर सांखला व राज्याध्यक्ष श्री. केतन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी भारतीय जैन संघटना चे राज्य कार्यकारिणी सदस्य सन्मती जैन(पत्रकार) विदर्भ अध्यक्ष किर्तिकुमार वायकोस, जिल्हा अध्यक्ष मंगलचंद कोठारी, गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद सुराणा यांचे सोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये