तहसीलदारांच्या निष्क्रीयतेला कंटाळून शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय
न्यायालयीन आदेशानंतरही फेरफार न झाल्याने तहसील कार्यालयातच विष प्राशन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही शेतजमिनीच्या फेरफाराचा निर्णय न घेता तहसील प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीला कंटाळून एका शेतकऱ्याने थेट तहसील कार्यालयातच विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना काल घडली. या प्रकारामुळे महसूल विभागासह संपूर्ण प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पीडिताची प्रकृती गंभीर आहे. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
पीडित शेतकऱ्याची ओळख
विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव परमेश्वर ईश्वर मेश्राम (वय ५५) असे असून तो मूळचा मोरवा येथील रहिवासी आहे. मेश्राम यांची कुरडा गावातील सर्वे क्रमांक ८७ वरील शेती ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे.
न्यायालयाचा निकालही न पाळल्याने संताप
मेश्राम यांचे वडील जिवंत असताना त्यांनी वरील शेतजमीन विधिवत विक्री करून मुलगा परमेश्वर यांच्या नावावर केली होती. मात्र, नंतर इतर बहिण-भावांनी या जमिनीबाबत आक्षेप घेत न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून शेवटी परमेश्वर मेश्राम यांच्या बाजूने निकाल दिला आणि जमीन त्यांच्याच नावे असल्याचे स्पष्ट केले.
या आदेशानंतर मेश्राम यांनी तहसील कार्यालयात फेरफारासाठी अर्ज दाखल केला. मात्र, अनेक महिने उलटूनही महसूल विभागाने कोणताही निर्णय घेतला नाही. उलट, विविध कारणांनी प्रकरणावर निर्णय घेणे टाळले जात असल्याचे दिसून आले.
महसूल पंधरवड्यातही निराशा
सध्या सुरु असलेल्या “महसूल पंधरवडा” मोहिमेत अनेक प्रकरणे निकाली काढली जात आहेत. मेश्राम यांनीदेखील आपले प्रकरण या कालावधीत सोडवले जाईल अशी अपेक्षा ठेवली होती. मात्र, वारंवार तहसील कार्यालयात चकरा मारूनही त्यांना केवळ निराशाच हाती लागली.
सायंकाळी टोकाचा निर्णय
शेवटी दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता, परमेश्वर मेश्राम यांनी थेट तहसील कार्यालयातच विष प्राशन केले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात हलविले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
तहसीलदारांकडून प्रतिसाद नाही
या संपूर्ण घटनेबाबत तहसीलदार राजेश भांडारकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे महसूल विभागाचा पंधरवडा सध्या सुरू असून महसूलाशी संबंधित तक्रारींवर निर्णय घेणे हीच मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत. अशा वेळीही एका न्यायालयीन आदेशानंतरच्या फेरफार प्रकरणाकडे दुर्लक्ष करून एका शेतकऱ्याला विष प्राशन करण्यास प्रवृत्त करणारी ही घटना महसूल विभागाच्या निष्क्रीयतेचे आणि उदासीनतेचे मोठे उदाहरण ठरली आहे.
स्थानिक शेतकरी संघटना आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत तहसील प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच, पीडित शेतकऱ्याच्या प्रकरणाचा तातडीने निकाल लावून त्याला न्याय द्यावा, अशीही मागणी होत आहे.