चंद्रपूरात उद्यापासून श्री माता महाकाली महोत्सवाची सुरुवात
सकाळी ९ वाजता मातेची प्रतिष्ठापना, तर रात्री सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांचा गायन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर – शहरातील धार्मिक परंपरेला अधोरेखित करणारा श्री माता महाकाली महोत्सव यंदा चौथ्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित हा महोत्सव शनिवार, २७ सप्टेंबर ते बुधवार, १ ऑक्टोबर दरम्यान श्री माता महाकाली मंदिर पठांगण येथे पार पडणार आहे.सराफा असोसिएशनच्या वतीने सकाळी जैन भवन येथून श्री माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीची पालखी व रथयात्रा काढून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी माता महाकालींची पालखी व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा निघणार असून भक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमणार आहे. शोभायात्रा महाकाली मंदिरात पोहोचल्यावर सकाळी ९ वाजता महोत्सव पंडालात महाकाली मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती व महाकाली महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
यानंतर नवरात्रोत्सव दरम्यान जन्मलेल्या कन्यारत्नांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात येईल. आरोग्य शिबिर व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटनही यावेळी पार पडणार आहे.
दुपारी २.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सादर करणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता महाआरती पार पडेल, तर रात्री ७.३० वाजता सुप्रसिद्ध गायक-गायिका पलक मुच्छल व पलश यांचा भक्तिसंगीताचा विशेष कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाच्या पुढील चार दिवसांत दररोज सकाळी महाआरती, भजन-कीर्तन, प्रवचने तसेच दिवसभर विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.