तुकूम येथील सांस्कृतिक सभागृह परंपरा, संस्कृती आणि मूल्ये जपणारे दालन ठरेल – आ. जोरगेवार
६० लाख रुपयांत तयार होणार सांस्कृतिक सभागृह; आ. जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन

चांदा ब्लास्ट
तुकूम येथील हनुमान मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक सभागृहासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी तब्बल ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. श्रद्धा, संस्कार आणि एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या परिसरात उभारण्यात येणाऱ्या सभागृहामुळे विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना योग्य व्यासपीठ मिळणार आहे. येणाऱ्या पिढ्यांना आपली परंपरा, संस्कृती आणि मूल्ये जपण्यासाठी हे सभागृह एक भक्कम दालन ठरेल, असे प्रतिपादन आमदार जोरगेवार यांनी केले.
गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, महामंत्री रवी गुरुनुले, तुषार सोम, सुनील महाराज केवट, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, माया मंदाडे, सीमा मडावी, सुधाकर बोंडे, हरीशचंद्र भाकरे, नलिनी देशमुख, विद्या वासेकर, प्रज्ञा गंदेवार, पुरुषोत्तम राहुत, सुमीत बेले, आशा बेले, आशा देऊळकर, प्रमोद शास्त्रकार, जयकुमार सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, नागरिकांना आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त सांस्कृतिक केंद्राची आवश्यकता होती. आज त्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. हे सभागृह केवळ बांधायचे नाही, तर त्याचा उपयोग सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी व्हावा. आपल्या समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग यात असलाच पाहिजे. आम्ही सातत्याने विकास कामांना प्राधान्य देत आहोत. या भागातील इतर प्रलंबित कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. तयार होणारे हे सभागृह आपले आहे, आपल्या सर्वांच्या स्वप्नांचे केंद्र आहे. याचा उपयोग एकतेसाठी, प्रगतीसाठी आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी होईल असे यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.